भर पावसाळ्यात उन्हाच्या झळा, कोल्हापुरात आजपासून पावसाचा हवामान खात्याचा अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 16:18 IST2025-08-08T16:17:59+5:302025-08-08T16:18:32+5:30
तीन बंधारे अजूनही पाण्याखाली

भर पावसाळ्यात उन्हाच्या झळा, कोल्हापुरात आजपासून पावसाचा हवामान खात्याचा अंदाज
कोल्हापूर : सध्या पावसाने थोडी विश्रांती घेतली असली तरी आज, शुक्रवार दि. ८ ऑगस्ट म्हणजे रक्षाबंधनापासून (नारळी पौर्णिमा) १५ ऑगस्टपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता निवृत्त हवामानतज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, जिल्ह्यात दुपारच्या कमाल तापमानात सरासरीपेक्षा ३ ते ४ डिग्रीने वाढ होऊन तापमान २६ ते २९ डिग्री दरम्यान जाणवत आहे. यामुळे उन्हाचा तडाखा जाणवत आहे.
गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाची उघडीप राहिली. गुरुवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासात जिल्ह्यात सरासरी २.३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सर्वाधिक पाऊस शिरोळ तालुक्यात ४.७ आणि गडहिंग्लज तालुक्यात ४.५ मिलिमीटर इतका नोंद झाला आहे.
राधानगरीतून १५०० आणि दूधगंगेतून १०० घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. वारणा धरणातून विसर्ग बंदच आहे. पंचगंगेची पाण्याची पातळी १५.१ फूट इतकी खाली असून या नदीवरील सुर्वे, रुई आणि इचलकरंजी हे तीन बंधारे अजूनही पाण्याखाली आहेत.
तापमान वाढल्याने वातावरणात उष्मा
गगनबावडा, पन्हाळा, शाहूवाडी, राधानगरी तालुक्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या. मात्र, कोल्हापूर शहरासह इतर ठिकाणी सकाळपासूनच ऊन राहिले. बऱ्याच दिवसांनी पूर्ण दिवसभर आकाश मोकळे दिसत होते. गुरुवारी कोल्हापूर जिल्ह्याचे किमान तापमान २४, तर कमाल २९ डिग्रीपर्यंत राहिले. किमान तापमान वाढल्याने वातावरणात उष्मा जाणवत होता.
घाट परिसरात आजपासून पावसाची शक्यता
राज्याच्या काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रायलसीमाच्या जवळ हवेच्या वरच्या थरात चक्रीय वातस्थिती निर्माण झाली आहे तसेच पूर्व-मध्य अरबी समुद्र ते बंगालच्या उपसागराच्या मध्य या पट्ट्यामध्ये पूर्व-पश्चिम द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. या दोन्ही प्रणालींमुळे पावसाची शक्यता वाढली आहे. कोल्हापूर, कोल्हापूर जिल्ह्याचा घाट परिसरात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी मात्र हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे.