कोल्हापुरात ऊसदर आंदोलनाला हिंसक वळण, निमशिरगावजवळ उसाची तीन वाहने पेटवली
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 11:54 IST2025-10-29T11:53:42+5:302025-10-29T11:54:28+5:30
आंदोलक घटनास्थळावरून पसार

कोल्हापुरात ऊसदर आंदोलनाला हिंसक वळण, निमशिरगावजवळ उसाची तीन वाहने पेटवली
जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यात मंगळवारी ऊसदराचे आंदोलन पेटले असून अज्ञातांनी कोल्हापूर-सांगली महामार्गावरील निमशिरगाव (ता. शिरोळ) फाट्याजवळ ऊस वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर पेटवून दिले. रात्री साडेनऊच्या सुमारास हा प्रकार घडला. शेतकरी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.
ऊसदरावरून तालुक्यात वेगवेगळी आंदोलने सुरू आहेत. विविध संघटनांकडून आंदोलने केली जात असून १ नोव्हेंबरपासून साखर कारखान्यांचा हंगाम सुरू होणार आहे. संघटनांनी केलेल्या दराच्या मागणीवर कारखानदार व शासनाकडून कोणताही प्रतिसाद दिसून येत नाही.
कारखानदारांकडून केवळ एफआरपी जाहीर केली जात असल्याने आंदोलनाची तीव्रता वाढत आहे. मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास उसाची वाहतूक करणारी तीन वाहने अडवून अज्ञातांनी पेटवून दिली. आगीचा भडका उडाल्यानंतर वाहने पेटवून दिल्याचे मार्गावरून जाणाऱ्यांच्या लक्षात आले. आंदोलक घटनास्थळावरून पसार झाले होते.
दरम्यान, मंगळवारी दिवसभरात काेथळी, जैनापूर, तमदलगे येथे स्वाभिमानी व आंदोलन अंकुशच्या कार्यकर्त्यांनी उसाची वाहने अडवून परत पाठवली. पावसामुळे हंगाम बिचकतच सुरू झाला असून, जिल्ह्यात हमीदवाडा, वारणा व घाेरपडे कारखाना सुरू झाला असून इतर कारखाने वेट ॲण्ड वॉचच्या भूमिकेत आहेत.