कोल्हापुरातील शिरोळमध्ये ऊसदराचा तोडगा निघाला, आंदोलन अंकुशचे आंदोलन मागे
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 18:08 IST2025-11-11T18:07:12+5:302025-11-11T18:08:24+5:30
दत्त व्यवस्थापन-आंदोलकांत बैठक

संग्रहित छाया
शिरोळ : ऊसदर प्रश्नी दराचा तोडगा निघाल्यामुळे आंदोलन अंकुशने सुरु केलेले आंदोलन मागे घेण्यात आले आहे. दत्तच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन पन्नास रुपये वाढवून मिळणार असून ऊस तुटल्यानंतर ३४५० रुपये आणि हंगाम संपल्यानंतर ५० रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत. दत्त व्यवस्थापन आणि अंकुशच्या कार्यकर्त्यांमध्ये रविवारी मध्यरात्री सर्वसमावेशक तोडगा निघाल्यामुळे हंगाम सुरळीत सुरु झाला आहे.
पहिली उचल ४ हजार रुपये व मागील हंगामातील २०० रुपये मिळावेत, या मागणीसाठी आंदोलन अंकुशने ऊसदराचा लढा सुरु केला होता. एल्गार परिषद घेऊन आंदोलनाची दिशा जाहीर केली होती. जोपर्यंत उसाला चांगला दर मिळत नाही तोपर्यंत ऊसतोडी बरोबर वाहतूक रोखण्याचा इशारा अंकुशने दिला होता. त्या पार्श्वभूमीवर गेल्या पंधरा दिवसांपासून धनाजी चुडमुंगे यांच्यासह कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरु केले होते.
शिरोळ तहसील कार्यालयावर संयुक्तपणे मोर्चा काढण्याबरोबरच ऊस वाहतूक अडविणे, नियमबाह्य ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांवर आरटीओ मार्फत कारवाई करण्यास भाग पाडणे यासह विविध आंदोलने सुरु केली होती. जाहीर केलेल्या दराचे स्वागत करुन स्वाभिमानीने दत्त विरोधातील आंदोलन मागे घेतले होते. तर अंकुशने आंदोलन सुरुच ठेवले होते. रविवारी रात्री उशिरा झालेल्या बैठकीवेळी माजी आमदार उल्हास पाटील, अंकुशचे जिल्हाध्यक्ष दीपक पाटील, अक्षय पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, सोमवारी दुपारी शिरोळ येथील शिवाजी तख्त येथे आभार सभा झाली.
कारखाना मोठा करुया : चुडमुंगे
ऊस उत्पादक शेतकऱ्यांबरोबर सर्वच घटकांनी आंदोलनाला बळ दिले. त्यामुळेच आंदोलनाला यश मिळाले. ३५०० रुपयापेक्षा अधिक दर अपेक्षित होता. म्हणून पुन्हा आंदोलन सुरु झाले होते. चांगुलपणाने पुढे जाऊन कारखाना मोठा करण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करुया, असे बैठकीवेळी आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी सांगितले.
रात्री उशिरापर्यंत बैठक
आंदोलन कुठेतरी मिटले पाहिजे या मानसिकतेतून दत्त कारखान्याचे प्रमुख गणपतराव पाटील, कार्यकारी संचालक एम.व्ही. पाटील यांच्यासह संचालकांनी प्रयत्न केले. कारखाना कार्यस्थळावर रविवारी रात्री उशिरापर्यंत बैठक घेण्यात आली. त्यानंतर यंदाच्या गळीत हंगामात प्रतिटन एकरक्कमी ३४५० रुपये व हंगाम संपल्यानंतर पन्नास रुपये प्रतिटन देण्यावर एकमत झाल्यानंतर अंकुशच्या कार्यकर्त्यांनी सुरु केलेले आंदोलन थांबवले.