Kolhapur: वीजतारांच्या शॉर्टसर्किटमुळे १५ एकरांवरील ऊस जळून खाक, मडिलगे बुद्रुक येथील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 17:45 IST2026-01-07T17:44:39+5:302026-01-07T17:45:24+5:30
आगीत अंदाजे ३० लाख रुपयांचे नुकसान झाले

Kolhapur: वीजतारांच्या शॉर्टसर्किटमुळे १५ एकरांवरील ऊस जळून खाक, मडिलगे बुद्रुक येथील घटना
गारगोटी: मडिलगे बुद्रुक (ता. भुदरगड) येथे वीजपुरवठा करणाऱ्या तारांचे शॉर्टसर्किट झाल्याने भीषण आग लागून सुमारे १५ एकर क्षेत्रातील ऊस पिक जळून खाक झाला. आगीत शेतकऱ्यांचे अंदाजे ३० लाख रुपयांचे नुकसान झाले. आज, बुधवारी दुपारी ही घटना घडली.
गावाच्या शेजारी असलेल्या कुर पाणंद शेत परिसरात दुपारच्या सुमारास विजेच्या तारांचे शॉर्टसर्किट झाले. विजेच्या ठिणग्या पडल्याने क्षणात उसाच्या पिकाने पेट घेतला. उसाच्या वाळलेल्या पानांमुळे आगीने काही क्षणातच रौद्ररूप धारण केले. शिवाजी उगले, शंकर माळवेकर, सात्तापा गोजारे, पिंटू मोरे यांच्यासह शेतात काम करणाऱ्या अनेकांनी आग विझवण्यासाठी धाव घेतली. मात्र वाऱ्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवणे कठीण झाले.
शिवाजी उगले यांनी तत्काळ महावितरणशी संपर्क साधून विद्युत पुरवठा खंडित करण्यास सांगितले. त्यानंतर बिद्री साखर कारखान्याच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. तोपर्यंत आग मोठ्या प्रमाणात पसरली होती. अग्निशमन दलाच्या जवानांच्या सुमारे दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. तोपर्यंत जवळपास पंधरा एकरातील ऊस जळून खाक झाला होता.
आगीत सुधा पंडित, सर्जेराव शिंदे, एकनाथ माने, धनाजी देसाई, विश्वजीत देसाई, प्रभाकर धुमाळ, रघुनाथ उगले, उत्तम सुर्वे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांचे ऊस पीक पूर्णतः जळाले. हातातोंडाशी आलेले पीक आगीच्या भक्षस्थानी पडल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले. दरम्यान, तहसीलदार अर्चना पाटील यांनी तलाठ्यांना तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत.