कळंबा, जयंती, पंचगंगा प्रदूषणप्रकरणी म्हणणे मांडा; कोल्हापूर सर्किट बेंचची महापालिकेसह शासकीय यंत्रणांना नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 11:32 IST2026-02-06T11:32:11+5:302026-02-06T11:32:52+5:30
चार आठवड्यांची मुदत, जनहित याचिकेवर सुनावणी

कळंबा, जयंती, पंचगंगा प्रदूषणप्रकरणी म्हणणे मांडा; कोल्हापूर सर्किट बेंचची महापालिकेसह शासकीय यंत्रणांना नोटीस
कोल्हापूर : कळंबा तलाव, जयंती नाला (नदी) आणि पंचगंगा नदीच्याप्रदूषणाबद्दल चार आठवड्यांत म्हणणे मांडा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने महाराष्ट्र शासन, पर्यावरण व हवामान विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि कोल्हापूर महापालिकेला दिला. सामाजिक कार्यकर्ते सागर प्रकाश घोरपडे यांच्यामार्फत दाखल केलेल्या जनहित याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती आर. जी. अवचट आणि न्यायमूर्ती अजित कडेठाणकर यांच्या डिव्हिजन बेंचने गुरुवारी (दि. ५) हा आदेश दिल्याची माहिती ॲड. सर्जेराव खोत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
वाढत्या प्रदूषणामुळे कळंबा तलावासह जयंती नाला आणि पंचगंगा नदीच्या काठावरील प्राचीन मंदिरांचे पावित्र्य धोक्यात आले आहे. धार्मिक आणि ऐतिहासिक वारसा धोक्यात आल्याने नागरिकांच्या धार्मिक भावनांचा अवमान होतो. उद्योगधंदे, हॉस्पिटल, हॉटेल्स यांचे सांडपणी थेट तलावासह नाल्यात आणि पंचगंगा नदीत जात आहे. गंगा नदीच्या धर्तीवर पंचगंगा नदीचे पुनरुज्जीवन आणि जयंती, कळंबा प्रदूषणमुक्त व्हावा, अशी जनहित याचिका सागर घोरपडे यांनी २३ जानेवारी २०२६ रोजी सर्किट बेंचमध्ये दाखल केली होती.
यावर गुरुवारी पहिली सुनावणी झाली. न्यायमूर्ती अवचट आणि न्यायमूर्ती कडेठाणकर यांच्या डिव्हिजन बेंचने ॲड. खोत यांची बाजू ऐकून घेतली. तसेच महाराष्ट्र शासनासह इतर जबाबदार शासकीय यंत्रणांना चार आठवड्यात म्हणणे मांडण्याचा आदेश दिला. पुढील सुनावणी पाच मार्चला होणार आहे. पत्रकार परिषदेसाठी याचिकाकर्ते घोरपडे उपस्थित होते. ॲड. शिवराम जंगम आणि ॲड. जोतीराम कुंभार यांनी याचिका सादर करण्यात मदत केली.
प्राचीन महात्म्य धोक्यात
करवीर महात्म्य या ग्रंथात पंचगंगेसह जयंती नदीचे महत्त्व विषद केले आहे. कात्यायनी मंदिराजवळ उगम पावणाऱ्या जयंती नदीच्या काठावर कात्यायनीसह महादेव, हनुमान, सटवाई, यल्लम्मा, सिद्धिविनायक आणि फुलगुलेश्वर महादेव मंदिर आहे. पंचगंगेच्या काठावर अनेक प्राचीन मंदिरे आहेत. दुर्गंधीयुक्त सांडपाण्यामुळे या सर्व मंदिरांचे प्राचीन महात्म्य धोक्यात आल्याचा मुद्दा ॲड. खोत यांनी सर्किट बेंचमध्ये उपस्थित केला.
याचिकेतील प्रमुख मागण्या
- कळंबा तलावासह जयंती आणि पंचगंगेत जाणारे सांडपाणी थांबवावे.
- आधुनिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प तयार करावेत.
- जयंती, पंचगंगेचे पुनरुज्जीवन करावे.
- कळंबा तलाव आणि पंचगंगा नदी परिसर हेरिटेज व इको सेन्सिटिव्हिटी झोन घोषित करावा.
- प्रदूषण नियंत्रण मंडळाने नियमित तपासणी करावी.