कोल्हापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोकुळची निवडणूक प्रक्रिया सुरू करून ही निवडणूक महायुती म्हणूनच लढण्याच्या सूचना आम्हा सर्वांना दिल्या आहेत, असे स्पष्टीकरण गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी आज बुधवारी सकाळी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिले आहे. या संदर्भातील अपुऱ्या माहितीवरील कोणत्याही बातम्या आणि अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहनही त्यांनी केले आहे. पत्रकात ते म्हणतात : मंगळवार दि. २८ रोजी रात्री गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीबाबत मुख्यमंत्री फडणवीस, यांच्यासमवेत महायुतीमधील सर्व नेतेमंडळींची तास ते दीड तासभर बैठक झाली. मुंबईत त्यांच्या वर्षा या बंगल्यावर झालेल्या या बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, आमदार राजेश क्षीरसागर, जनसुराज्य पक्षाचे आमदार विनय कोरे, आमदार राजेंद्र पाटील - यड्रावकर, आमदार चंद्रदीप नरके, आमदार शिवाजीराव पाटील, गोकुळ दूध संघाच्या संचालिका शौमिका महाडिक, युवा नेते समित कदम आदी नेतेमंडळी उपस्थित होती. दरम्यान या निवडणुकीत नवीन आलेल्या कायद्याबाबत चर्चा झाली. त्यानंतर मुख्यमंत्री म्हणाले की , ही निवडणूक मी ताबडतोब लावतो. विधिमंडळाने संमत केलेल्या नवीन कायद्याबाबतच्या अडचणी काय आहेत, त्याबाबतची माहितीही त्यानी दिली. त्यावर काय उपाय शोधता येतील, याबाबतही बैठकीत अनेक नेत्यांनी आपापली मते सुचविली. आज बुधवार दि. २९ कायदे सल्लागारांची बैठक घेऊन या दोन्हीही मुद्द्यांवर तोडगा काढतो आणि महायुती म्हणूनच ही निवडणूक लढवा, असा आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी आम्हा सर्व नेतेमंडळींना दिला आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका.....!
मुश्रीफ यांनी पुढे म्हटले आहे, आज अपुऱ्या माहितीवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. चार मे २०२६ रोजीच ही सर्व परिस्थिती स्पष्ट होईल. त्यामुळे, त्याबद्दल कोणीही गैरसमज करून घेण्याचे कारण नाही.
Web Summary : CM Fadnavis directed to promptly initiate Gokul election process, contesting as a grand alliance. Misinformation should be disregarded. Final decision expected May 4, 2026.
Web Summary : मुख्यमंत्री फडणवीस ने गोकुल चुनाव प्रक्रिया तुरंत शुरू करने और महागठबंधन के रूप में चुनाव लड़ने का निर्देश दिया। गलत सूचनाओं पर ध्यान न दें। अंतिम निर्णय 4 मई, 2026 को अपेक्षित है।