दक्षिण भारत जैन सभेचे अधिवेशन

By Admin | Updated: December 17, 2014 23:58 IST2014-12-17T23:23:06+5:302014-12-17T23:58:56+5:30

शनिवारी प्रारंभ : गुणवंतांचा होणार सन्मान

South India Jain Sabha Convention | दक्षिण भारत जैन सभेचे अधिवेशन

दक्षिण भारत जैन सभेचे अधिवेशन

कोल्हापूर : येथील दक्षिण भारत जैन सभेचे ९४ वे त्रैवार्षिक अधिवेशन २० व २१ डिसेंबरला कोल्हापुरातील शाहू सांस्कृतितक मंदिरमध्ये होत असून, त्यासाठी महाराष्ट्र व कर्नाटक येथून सुमारे दहा हजार प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. या अधिवेशनात समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांचा सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती दक्षिण भारत जैन सभेचे चेअरमन प्रा. डी. ए. पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितली.
अधिवेशनाचे उद्घाटन शनिवारी (दि.२०) सकाळी शिवाजी विद्यापीठाचे कुुलगुरू डॉ. एन. जे. पवार यांच्या हस्ते व महापौर तृप्ती माळवी यांच्या उपस्थितीत होणार आहे. तत्पूर्वी धर्म ध्वजारोहण, स्वर्गीय शांतिनाथ पाटणे नगरचे उद्घाटन व डॉ. विलास संगवे व्यासपीठाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.
पहिल्या दिवशी उद्घाटन सत्रानंतर दक्षिण भारत महिला परिषद, वीर महिला मंडळ मध्यवर्ती समिती अधिवेशन तर दुपारच्या सत्रात पदवीधर संघटना अधिवेशन, वीर सेवादल मध्यवर्ती समिती अधिवेशन होणार आहे. सायंकाळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहेत.
रविवारी दुपारी श्रीमंत शाहू छत्रपती महाराज व विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या हस्ते तसेच दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष रावसाहेब आ. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विविध पुरस्कार वितरण व स्मरणिका प्रकाशन होणार आहे. पुरस्कार वितरण समारंभास अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
यावेळी राजेंद्र पाटील-यड्रावकर, प्रा. साधना झाडबुके, अ‍ॅड. गोविंद पानसरे,डॉ. जयकुमार उपाध्ये, मीना गरिबे, प्रा. धरणेंद्र कुरकुरी, वसंतराव चौगुले नागरी पतसंस्था, अजितकुमार भंडे, ‘सकाळ’चे संपादक श्रीराम पवार, श्रीधर मेक्कळके , डॉ. सुनीलकुमार लव्हटे, सुधा नेजे, पंडित सुशीलकुमार उपाध्ये, माजी आमदार शरद पाटील आदी मान्यवरांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात येणार आहे.
पत्रकार परिषदेस सागर चौगुले, प्रा. ए. ए. मुडलगी, जीवधर चौगुले, संजय शेटे, सुकुमार पाटील,सुरेश रोटे, राजू शेरवी, शीतल पाटील, राजेंद्र झेले आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: South India Jain Sabha Convention