Kolhapur Crime: ९ हजार रुपये घेतल्याचा संशय, डोक्यात वरवंटा घालून मुलाने केला वडिलांचा खून
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 11:46 IST2026-02-14T11:46:23+5:302026-02-14T11:46:49+5:30
मृत दत्ताराम हे माजी सैनिक, शाहूवाडी तालुक्यातील घटना

Kolhapur Crime: ९ हजार रुपये घेतल्याचा संशय, डोक्यात वरवंटा घालून मुलाने केला वडिलांचा खून
मलकापूर: घरात ठेवलेले ९ हजार रुपये घेतल्याच्या संशयातून मुलानेच वडिल दत्ताराम संभाजी केसरकर (वय ८३) यांचा खून केल्याची धक्कादायक घटना शाहूवाडी तालूक्यातील उचत येथे घडली. याप्रकरणी आरोपी संतोष केसरकर याला पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत साधना संतोष केसरकर यांनी शाहूवाडी पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.
गावडी येथील दत्ताराम केसरकर हे उचत येथे घर बांधून राहत होते. त्यांचा मुलगा संतोष याला दारुचे व्यसन होते. तो गावडी येथे शेती करीत होता. गुरुवार (दि.११) तो गावडीहून उचत येथे आला होता. संतोष यांने घरातील बॅगेत ठेवलेले पैसे आढळून न आल्याने पैशांबाबत चौकशी केली; मात्र कोणीही कबुली दिली नाही. यानंतर त्याने वडिलांवरच पैसे घेतल्याचा संशय घेतला.
संतोष यांच्या मुलीच्या शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रम पाहण्यासाठी घरातील सर्वांच्या बरोबर आरोपी देखील गेला होता. मात्र पैसे कुणी घेतले हे त्याच्या डोक्यात विचार सुरु होता. कार्यक्रम अर्ध्यावर सोडून रात्री घरी येवून वडील दत्ताराम केसरकर यांचे बरोबर पैशांच्या कारणावरून कडाक्याचे भांडण झाले. रागाच्या भरात संतोष याने घरातील दगडी वरवंटा डोक्यात मारून वडिलांना गंभीर जखमी केले. डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने दत्ताराम केसरकर यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेनंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने घरातील फरशीवरील रक्त ओढणीच्या साहाय्याने पुसून टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. घरातील सर्व मंडळी स्नेह संमेलन संपल्यावर घरी आल्यावर हा प्रकार उघडकीस आला. शाहूवाडी पोलिसांनी तातडीने दत्ताराम यांना मलकापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात दत्ताराम यांचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मलकापूर ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला.