Kolhapur: माझं लग्न कधी करणार; मुलाने आईवर केला विळीने वार, हाताचे बोट तुटले
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 12:55 IST2025-11-14T12:53:52+5:302025-11-14T12:55:03+5:30
मुलग्याला अटक

Kolhapur: माझं लग्न कधी करणार; मुलाने आईवर केला विळीने वार, हाताचे बोट तुटले
इचलकरंजी : लग्न कधी करणार या कारणावरून मुलाने आईवर विळीने वार केला. या घटनेत आईच्या हाताच्या बोटाचे एक पेर तुटून खाली पडले. जखमी आई सुरेखा दादू गेजगे (वय ४५) यांच्या फिर्यादीवरून वैभव गेजगे (२४, रा. इंदिरा नगर, कोरोची) याला शहापूर पोलिसांनी अटक केली. ही घटना कोरोची (ता. हातकणंगले) येथे घडली. शहापूर पोलिस ठाण्यात मुलग्यावर गुन्हा दाखल झाला.
पोलिसातून मिळालेली माहिती अशी, सुरेखा या पती, तीन मुले, सुना व नातवंडांसह एकाच घरात राहतात. बुधवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास सर्वजण जेवणासाठी बसले असताना वैभव याने माझे लग्न कधी लावणार, या कारणावरून आई सुरेखा यांच्याशी वाद घातला. तसेच त्याने जवळच असलेली कांदा कापण्याची विळी उचलली आणि आईच्या अंगावर झेप घेत तिच्या उजव्या हातावर वार केला.
घटनेनंतर वैभव पळून गेला होता. त्याला पोलिसांनी अटक केली. जखमी अवस्थेत सुरेखा यांना कुटुंबीयांनी तत्काळ हातकणंगले येथील खासगी रुग्णालयात उपचार केले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी आयजीएम रुग्णालयात हलविण्यात आले आहे.