कोल्हापुरात काँग्रेस, भाजपला धक्का; शारंगधर देशमुखांसोबत कोण..कोण?, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत आज पक्षप्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 12:11 IST2025-06-24T12:10:33+5:302025-06-24T12:11:33+5:30
१२ ते १५ जण येणार असल्याचा दावा

कोल्हापुरात काँग्रेस, भाजपला धक्का; शारंगधर देशमुखांसोबत कोण..कोण?, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत आज पक्षप्रवेश
कोल्हापूर : महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या हालचाली गतिमान झाल्या असून आज, मंगळवारी कोल्हापुरातील काँग्रेसचे शारंगधर देशमुख यांच्यासह काही माजी नगरसेवक शिंदेसेनेत प्रवेश करणार आहेत. हा पक्ष प्रवेशाचा समारंभ मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुक्तागिरी या शासकीय निवासस्थानी पार पडणार आहे. देशमुख व सत्यजित कदम यांचे समर्थक असलेले साधारणपणे १२ ते १५ माजी नगरसेवक शिंदेसेनेत प्रवेश करणार असल्याचा दावा केला जात आहे. परंतु कोण कोण प्रवेश करणार याबाबत मात्र गोपनियता पाळण्यात आली आहे. त्यामुळे उत्सुकता वाढून राहिली आहे.
शारंगधर देशमुख हे एकेकाळचे काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांचे कट्टर समर्थक होते. दहा वर्षे त्यांच्याकडे काँग्रेसचे गटनेते पद देऊन आघाडी सांभाळण्याचे काम त्यांनी त्यांच्यावर सोपविले होते. त्यामुळे देशमुख यांनी काँग्रेसची साथ सोडून शिंदे गटात प्रवेश करणे म्हणजे आमदार सतेज पाटील यांना धक्का मानला जातो. त्यांची कोल्हापूर दक्षिणमधील कारभाराची सुत्रे देशमुख सांभाळत होते.
सत्यजित कदम यांनीही ताराराणी आघाडीचे गट नेतेपद सांभाळले होते. या आघाडीची महापालिकेत भाजपबरोबर युती झाली होती परंतु महाडिक यांचे जवळचे नातेवाईक असलेल्या कदम यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने तसेच कदम समर्थक माजी नगरसेवक प्रवेश करणार असल्याचे खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक यांनाही हा धक्का मानला जात आहे.
महापालिकेतील ताराराणी आघाडीचे गटनेते सत्यजित कदम यांनी विधानसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर माजी नगरसेवक रमेश पुरेकर यांनी आठ दिवसांपूर्वी प्रवेश केला. त्यानंतर आता आज, मंगळवारी काँग्रेस पक्षाचे माजी गटनेते व स्थायी समितीचे माजी सभापती शारंगधर देशमुख यांच्यासह काही नगरसेवक शिंदेसेनेत प्रवेश करतील. या पक्षप्रवेश समारंभास पालकमंत्री प्रकाश आबिटकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, माजी खासदार संजय मंडलिक, आमदार चंद्रदीप नरके, सत्यजित कदम उपस्थित राहणार आहेत.