बिनधास्त करा थर्टीफर्स्टची पार्टी, मद्य पिण्याचा परवाना काढा..कारवाई टाळा; देशी-विदेशीच्या परवान्यासाठी 'इतका' दर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2022 01:40 PM2022-12-30T13:40:11+5:302022-12-30T14:16:50+5:30

मद्य प्राशन करण्याचा परवाना सोबत असेल तर पोलिसांच्या कारवाईची चिंता नसते.

Sixty thousand licenses for alcoholics in Kolhapur on the 31st | बिनधास्त करा थर्टीफर्स्टची पार्टी, मद्य पिण्याचा परवाना काढा..कारवाई टाळा; देशी-विदेशीच्या परवान्यासाठी 'इतका' दर

संग्रहीत फोटो

googlenewsNext

कोल्हापूर : नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जल्लोषी पार्टीची तयारी करीत असाल तर सावधान. कारण मद्यपींना मद्य प्राशन करण्याचा परवाना बंधनकारक आहे. ३१ डिसेंबरची गरज लक्षात घेऊन राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यात ६० हजार परवाने विक्रीसाठी उपलब्ध केले आहेत. त्यामुळे परवाना घेऊनच पार्टीचा बेत केल्यास आनंदावर विरजन पडणार नाही.

३१ डिसेंबर म्हटले की अनेकांचा रंगीत-संगीत पार्टीचा बेत ठरलेला असतो. बार, रेस्टो यासह फार्महाऊस आणि काही घरांमध्ये ही रात्री उशिरापर्यंत पार्ट्या रंगतात. अशावेळी मद्य प्राशन करण्याचा परवाना सोबत असेल तर पोलिसांच्या कारवाईची चिंता नसते. मात्र विना परवाना मद्य प्राशन केल्यानंतर पोलिसांच्या कारवाईत सापडले तर रंगाचा बेरंग होण्याचा धोका असतो. त्यामुळे ३१ डिसेंबरसाठी दारू पार्टी करणाऱ्यांनी परवाना घेऊनच मद्य खरेदी करावी, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाने केले आहे.

जिल्ह्यात ३१ डिसेंबरला ६० हजार परवाने विक्रीसाठी उपलब्ध केल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक रवींद्र आवळे यांनी सांगितले. देशी दारू पिणाऱ्यांसाठी एक दिवसाच्या परवान्याचे दोन रुपये द्यावे लागतील, तर विदेशी पिणाऱ्यांसाठी पाच रुपये द्यावे लागणार आहेत. सर्व वाईन शॉप आणि बिअर बारमध्ये परवाने विक्रीची व्यवस्था करण्यात आली आहे. मद्य विक्री करतानाच विक्रेत्यांकडून ग्राहकांना परवाने दिले जाणार आहेत. परवाने विक्रीतून राज्याच्या तिजोरीत महसुलाची भर पडणार आहे.

ऑनलाइन ही परवाने उपलब्ध

मद्य प्राशन करण्याचे परवाने ऑनलाइन ही उपलब्ध आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या संकेतस्थळावरून डिजिटल सहीचे परवाने दिले जातात. त्यासाठी ग्राहकांना स्वत: चा फोटो असलेले ओळखपत्र आणि निवासाचा पुरावा अपलोड करावा लागतो. त्यामुळे आता घरबसल्या ही मद्य प्राशनाचे परवाने घेऊ शकता.

परवाने घेण्यात निरुत्साह

गेल्यावर्षी राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यात ५० हजार परवाने विक्रीसाठी उपलब्ध केले होते. मात्र त्यापैकी केवळ २३ ते २४ हजार परवान्यांची विक्री झाली होती. विना परवाना मद्य प्राशन केल्याचे आढळल्यास १०० ते ५०० रुपयांचा दंड होऊ शकतो, त्यामुळे परवाने घेऊनच मद्य प्राशन करावे, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाने केले आहे.

परवाने आणि दर

एक दिवस - देशी- २ रुपये, विदेशी ५ रुपये
वर्षभरासाठी - १०० रुपये
आजीवन - १००० रुपये
 

Web Title: Sixty thousand licenses for alcoholics in Kolhapur on the 31st

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.