Kolhapur Crime: बिद्रीतील गर्भलिंग निदान प्रकरणी दोन महिलांसह सहा जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 15:44 IST2026-03-28T15:42:50+5:302026-03-28T15:44:25+5:30
मुख्य संशयित डॉ. उत्तमकुमार बळवंत सरदेसाई आणि आक्काताई बळवंत कांबळे हे अद्याप फरार

Kolhapur Crime: बिद्रीतील गर्भलिंग निदान प्रकरणी दोन महिलांसह सहा जणांना अटक
कोल्हापूर : अवैधरीत्या गर्भलिंग तपासणी होत असल्याच्या संशयावरून बिद्री (ता. कागल) येथील श्रद्धा हॉस्पिटलवर कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने सोमवारी छापा टाकला होता. या कारवाईत डॉ. युवराज पाटील आणि एजंट संभाजी शिंदे यांना अटक झाली होती. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरच्या पथकाने व इस्पुर्ली पोलिसांनी संयुक्त कारवाई करीत शुक्रवारी सहा जणांना अटक केली.
या प्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. अटकेतील युवराज पाटील व संभाजी शिंदे यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. या प्रकरणाचा गुन्हा मुरगूड पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. मात्र, या प्रकरणाचा तपास इस्पुर्ली पोलिस ठाणे व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे आहे.
बिद्री येथील श्रद्धा हॉस्पिटलवर केलेल्या कारवाईत सोनोग्राफी मशीन आणि काही औषधेही जप्त करण्यात आली होती. संशयितांचे जबाब आणि त्यांच्या कॉल डिटेल्सवरून पोलिसांनी एकूण दहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. गुरुवारी सहा जणांना पोलिसांनी अटक केली असून, मुख्य संशयित डॉ. उत्तमकुमार बळवंत सरदेसाई (वय ६०, रा. सदर बाजार, कोल्हापूर) आणि आक्काताई बळवंत कांबळे (रा. बिद्री, ता. कागल) हे अद्याप फरार आहेत.
अटक झालेल्यांची नावे : मनीषा दिनकर कांबळे (वय ३५, रा. सावर्डे पाटणकर, ता. राधानगरी), नंदा ईश्वरा गुरव (वय ४२ रा. बोरवडे, ता. कागल), बाजीराव श्रीपती तिकोडे (वय ६०, रा. मडिलगे बुद्रुक, ता. भुदरगड), विक्रम आनंदा पाटील (वय ४०, रा. बिद्री, ता. कागल), सुखदेव उर्फ पोपट पांडुरंग पाटील (वय ४०, रा. सोनाळी, ता. कागल), सुनील सदाशिव गुरव (वय ३५, रा. सरवडे, ता. राधानगरी). या प्रकरणातील आरोपींची वाढती संख्या लक्षात घेता मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.