कोल्हापूर-सांगली रस्त्यावर सहा 'ब्लॅक स्पॉट', रस्ता बनला मृत्यूचा सापळा
By भीमगोंड देसाई | Updated: October 8, 2025 12:10 IST2025-10-08T12:09:47+5:302025-10-08T12:10:08+5:30
अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित

कोल्हापूर-सांगली रस्त्यावर सहा 'ब्लॅक स्पॉट', रस्ता बनला मृत्यूचा सापळा
भीमगोंडा देसाई
कोल्हापूर : कोल्हापूर-सांगली या ३५ किलोमीटरच्या रस्त्यावर सहा अपघातप्रवण क्षेत्रे (ब्लॅक स्पॉट) आहेत. येथे वारंवार अपघात आणि वाहतूक कोंडी होत असते. पोलिस आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे. या अपघातप्रवण ठिकाणी विविध उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.
नागपूर-रत्नागिरी महामार्गावरील कोल्हापूर-सांगली रस्त्याचे विस्तारीकरण अनेक वर्षांपासून रखडले आहे. या रस्त्याची वारंवार चाळण होत आहे. वाहतूक प्रचंड आणि रस्ता अरुंद, खराब रस्त्यामुळे वारंवार अपघात होत आहेत. अनेकांचे जीव जात आहेत. हातपाय मोडत आहेत. जमीन संपादनासह अनेक अडचणींमुळे रस्त्याचे काम तातडीने सुरू होण्याची चिन्हे नाहीत. म्हणून पोलिस प्रशासन, महामार्ग प्राधिकरणाने ब्लॅक स्पॉट शोधून उपाययोजना करण्याचे नियोजन केले आहे.
रस्ता मृत्यूचा सापळा
कोल्हापूर-सांगली रस्ता सन २०१२ पासून प्रलंबित आहे. टोलला विरोध झाल्यानंतर ठेकेदार कंपनी काम अर्धवट सोडून गेली. त्यानंतर रस्त्याची केवळ डागडुजी केली जात आहे. आता या रस्त्याचा समावेश नागपूर-रत्नागिरी महामार्गात झाला आहे. तरीही अजून या रस्त्याच्या कामाला सुरुवात झालेली नाही. परिणामी, हा रस्ता मृत्यूचा सापळा बनल्याच्या तक्रारी आहेत.
ब्लॅक स्पॉटची नावे आणि अंतर असे..
चोकाक फाटा ते विशाल मंगल कार्यालय, इचलकरंजी फाटा (प्रत्येकी ५० मीटर), चौंडेश्वरी फाटा (४०० मीटर), अंकली टोलनाका (५० मीटर), केपीटी चौक (१०० मीटर), हनुमान मंदिर (५० मीटर). त्याशिवाय पाचमैल रस्ता ते कुरुंदवाड मार्गावरील इंडियन ऑईल पंप ते तेरवाड (४५० मीटर), हेरवाड बस स्टँड (४०० मीटर) हे दोन महत्वाचे ब्लॅक स्पॉट आहेत.
उपाययोजना कोणत्या?
रस्ता दुभाजकाची उंची वाढवणे, वेगमर्यादेचा फलक लावणे, स्पीड ब्रेकर करणे, साईडच्या झाडांच्या फांद्या तोडणे, खड्डे भरणे, दिशादर्शक फलक लावणे, हॉकर्स काढणे, रम्बलर स्ट्रीप लावणे, अतिक्रमण काढणे, वळणाच्या ठिकाणी फलक लावणे, अंकली टोलनाका आणि केपीटी चौकात साईडपट्टी १० मीटर करणे अशा उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.
अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित
पोलिस उपअधीक्षक, हातकणंगले पोलिस निरीक्षक, उजळाईवाडी महामार्ग पोलिस, प्रादेशिक परिवहन अधिकारी, राष्ट्रीय महामार्गचे अधिकारी, कर्मचाऱ्यांवर ब्लॅक स्पॉटला भेट देण्याची जबाबदारी निश्चित केली आहे. हे अधिकारी वेळोवेळी भेट देऊन अपघात, वाहतूक कोंडी रोखण्याच्या उपाय योजनांचा आढावा घेणार आहेत. दरम्यान, सध्या रस्त्याची दयनीय स्थिती असल्याने वाहनधारकांचा वेळ वाया जात आहे. इंधनावर जादा खर्च करावा लागत आहे.