Kolhapur: शौमिकांनी डिबेंचरबाबत त्यांच्या सासऱ्यांना विचारावे, अरुण डोंगळे यांचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 15:52 IST2025-10-17T15:52:30+5:302025-10-17T15:52:43+5:30
त्यांच्या कालावधीत एवढी कपात नव्हती : शौमिका महाडिक यांचा पलटवार

Kolhapur: शौमिकांनी डिबेंचरबाबत त्यांच्या सासऱ्यांना विचारावे, अरुण डोंगळे यांचा टोला
कोल्हापूर : डिबेंचर कपातही १९९३ पासून सुरू आहे. संघाचे तत्कालीन नेते माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या संकल्पनेतूनच ही कपात केली आहे. याबाबत, शौमिका महाडिक यांनी त्यांच्या सासऱ्यांनाच विचारायला हवे होते, असा टोला ‘गोकुळ’चे ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे यांनी पत्रकारांशी बोलताना हाणला.
डोंगळे म्हणाले, संघाला दूध संस्था सभासद आहेत. त्यामुळे आतापर्यंत दूध उत्पादकांबरोबरच संस्थांचे हित जोपासले आहे. डिबेंचर कपातीचा निर्णय १९९३ ला महादेवराव महाडिक यांची सत्ता असतानाच घेतला आहे. संस्थेच्या दृष्टीने हिताचा असल्याने त्याची अंमलबजावणी आतापर्यंत सुरू आहे. यावेळी, ‘गोकुळ’ संचालक प्रा. किसन चौगले, अजित नरके, बाळासाहेब खाडे, अमरसिंह पाटील, कर्णसिंह गायकवाड, प्रकाश पाटील, एस.आर. पाटील, कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले आदी उपस्थित होते.
वाचा- ..अन्यथा गोकुळचे दूध बंद करू, संस्थाचालकांचा इशारा; आयकर चुकवून शासनाबरोबर उत्पादकांनाही फसवल्याचा आरोप
दरम्यान, याबाबत शौमिका महाडिक म्हणाल्या, महादेवराव महाडिक यांच्या कालावधीपासून कपात सुरू आहे, हे मान्य आहे. पण त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात कपात केली नव्हती.
‘टोकण’साठी कपात केली का?
सत्तारुढ गटाने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संस्था प्रतिनिधींना ‘टोकण’ दिले आहे. त्यासाठी दूध उत्पादकांच्या फरकातून डिबेंचर कपात केली का? अशी विचारणा आंदोलनकर्त्यांनी केली.