Local Body Election: ग्रामीण भागात मजुरांचा तुटवडा, शेतकऱ्यांसह रोपवाटिका चालकांना मजूर शोधण्याची वेळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 12:23 IST2025-12-01T12:23:13+5:302025-12-01T12:23:45+5:30
ग्रामीण भागात असणाऱ्या ऊस रोपवाटिकेतील महिलांचा गट रोपवाटिका बंद करून प्रचाराला

संग्रहित छाया
दत्तवाड : नगरपालिका निवडणुकीमुळे ग्रामीण भागात मजुरांचा तुटवडा जाणवत असून रोपवाटिकांमध्ये काम करणाऱ्या महिला रोपवाटिका बंद करून प्रचारासाठी शहरात जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसह रोपवाटिका चालकांना मजूर शोधण्याची वेळ आली आहे.
सध्या नगरपालिका निवडणुका सुरू आहेत. त्यामुळे प्रचार फेरीसाठी व प्रचारासाठी ग्रामीण भागातून महिला, पुरुषांना बोलावले जात आहे. त्यामुळे ग्रामीण भागात मजुरांचा तुटवडा जाणवत आहे तर ग्रामीण भागात असणाऱ्या ऊस रोपवाटिकेतील महिलांचा गट रोपवाटिका बंद करून प्रचाराला जात आहे.
सध्या ऊस हंगाम सुरू असून शेतकरी कारखान्याला ऊस घालवण्याच्या पाठीमागे लागला आहे. ऊसतोड सुरू असताना कांड्या गोळ्या करणे, पाला गोळा करणे, पाला पेटवणे, यासह शेतीतील इतर कामासाठी मजुरांची आवश्यकता असते. मात्र, त्याचवेळी निवडणूक सुरू असल्याने ग्रामीण भागात शेतकऱ्यांना मजुरांचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे मजूर शोधण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.