बेळगाव महापालिकेच्या महापौरपदी शोभा सोमणा, रेश्मा पाटील उपमहापौर; भाजपकडून पहिल्यांदाच मराठी भाषिक महिलांची निवड 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2023 04:44 PM2023-02-06T16:44:00+5:302023-02-06T16:44:30+5:30

निवडणूक प्रक्रियेस वेळेवर उपस्थित न राहणाऱ्या 3 नगरसेवकांना सभागृहाबाहेरच रोखण्यात आल्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन केले

Shobha Somana as Mayor of Belgaum Municipal Corporation, Reshma Patil as Deputy Mayor, For the first time, Marathi speaking women have been selected by BJP | बेळगाव महापालिकेच्या महापौरपदी शोभा सोमणा, रेश्मा पाटील उपमहापौर; भाजपकडून पहिल्यांदाच मराठी भाषिक महिलांची निवड 

बेळगाव महापालिकेच्या महापौरपदी शोभा सोमणा, रेश्मा पाटील उपमहापौर; भाजपकडून पहिल्यांदाच मराठी भाषिक महिलांची निवड 

googlenewsNext

प्रकाश बेळगोजी 

बेळगाव : राज्याचे लक्ष वेधून घेतलेल्या बेळगावमहापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक आज, सोमवारी पार पडली. यात महापौरपदी शोभा सोमणा तर उपमहापौरपदी रेश्मा पाटील यांची निवड झाली. बेळगाव महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपकडून महापौर व उपमहापौरपदी मराठी भाषिक महिलांची निवड करण्यात आली.

काँग्रेसने सकाळी महापौर निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केल्यानंतर ही निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे स्पष्ट झाले होते. याखेरीज महापौर निवडणुकीसाठी भाजपच्या अनगोळच्या प्रभाग 57 च्या नगरसेविका शोभा मायाप्पा सोमणा यांच्या व्यतिरिक्त अन्य कोणाचाही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. त्यामुळे सोमणा यांची महापौरपदी बिनविरोध निवड झाली.

उपमहापौर पदासाठी नगरसेविका रेश्मा प्रवीण पाटील आणि वैशाली सिद्धार्थ भातकांडे यांनी अर्ज दाखल केले होते. निवडणुकीत भातकांडे यांना 4 मते तर पाटील यांना 42 मते पडली. पाटील यांनी भातकांडे यांचा 38 मतांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या तीनही नगरसेवकांनी मतदान केले मात्र नगरसेविका भातकांडे यांना चौथेही मत पडले.

निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर प्रादेशिक आयुक्त एम. जी. हिरेमठ यांनी प्रसार माध्यमांना निवडणूक निकालाची माहिती दिली. सदर माहिती देताना त्यांनी निवडणूक प्रक्रियेपूर्वी सर्व नगरसेवकांचा शपथविधी पार पडल्याचेही सांगितले.

दरम्यान, बेळगाव महापौर आणि उपमहापौर निवडणूक प्रक्रियेस वेळेवर उपस्थित न राहणाऱ्या 3 नगरसेवकांना सभागृहाबाहेरच रोखण्यात आल्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन छेडले. महापौर आणि उपमहापौर पदाची मुख्य निवडणूक प्रक्रिया दुपारी 3 वाजता प्रारंभ होणार होती. या संदर्भात सर्व नगरसेवकांना कल्पना देण्यात आली होती.

मात्र काही कारणास्तव नगरसेविका खुर्शिदा मुल्ला, नगरसेविका झरीन फतेखान व नगरसेवक सोहेल संगोळ्ळी या तिघा जणांना महापालिकेत पोहोचण्यास 3 मिनिटे उशीर झाला. त्यामुळे त्यांना सभागृहात प्रवेश न देता बाहेरच रोखण्यात आले. निवडणुकीसाठी सभागृहात प्रवेश नाकारण्यात आल्यामुळे संतप्त झालेल्या या तीनही नगरसेवकांनी महापालिकेत ठिय्या आंदोलन छेडून निषेध नोंदविला.

Web Title: Shobha Somana as Mayor of Belgaum Municipal Corporation, Reshma Patil as Deputy Mayor, For the first time, Marathi speaking women have been selected by BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.