‘गोकुळ’च्या निवडणुकीत शिरोळ तालुका वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:23 IST2021-04-22T04:23:24+5:302021-04-22T04:23:24+5:30

संदीप बावचे शिरोळ : पंधरा वर्षे संचालक व अध्यक्षपद भूषविलेल्या शिरोळ तालुक्याला कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीत ...

Shirol taluka deprived in Gokul elections | ‘गोकुळ’च्या निवडणुकीत शिरोळ तालुका वंचित

‘गोकुळ’च्या निवडणुकीत शिरोळ तालुका वंचित

संदीप बावचे

शिरोळ : पंधरा वर्षे संचालक व अध्यक्षपद भूषविलेल्या शिरोळ तालुक्याला कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीत सत्ताधारी व विरोधी आघाडीकडून उमेदवारी दिली नसल्याने इच्छुक उमेदवारांमध्ये नाराजीचे चित्र आहे. त्यामुळे १३४ सभासद असलेल्या तालुक्यातील मतदारांचा फायदा कोणत्या आघाडीला होणार, अशी चर्चा सुरू आहे.

गोकुळचे माजी अध्यक्ष दिलीपराव पाटील यांनी शिरोळ व हातकणंगले तालुक्यांतून पंधरा वर्षे संचालक म्हणून काम केले आहे, तर त्यांना अध्यक्षपदाचीही संधी मिळाली होती.

युती सरकारच्या काळात भाजपचे अनिल यादव यांना गोकुळचे संचालक पद मिळाले होते. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत सत्ताधारी व विरोधी आघाडीकडून उमेदवारी कोणाला मिळणार, याबाबत उत्सुकता होती. गोकुळचे माजी अध्यक्ष पाटील यांच्यासह पंचायत समितीचे माजी सभापती भालचंद्र कागले, भीमगोंडा बोरगांवे यांच्यासह अन्य ठरावधारक सभासदांनी उमेदवारीसाठी नेत्यांना साकडे घातले होते. परंतु, सत्ताधारी व विरोधी आघाडीतून शिरोळमधील एकाही ठरावधारक सभासदाला नेत्यांनी उमेदवारी दिलेली नाही.

गोकुळच्या या निवडणुकीत राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, ‘दत्त’चे अध्यक्ष गणपतराव पाटील, माजी आमदार उल्हास पाटील, माजी खासदार राजू शेट्टी यांनी कार्यकर्त्यांना संधी मिळावी, यासाठी प्रयत्न केले होते. मात्र, त्याला यश आले नाही. दरम्यान, माजी खासदार शेट्टी यांच्या भूमिकेकडे लक्ष लागून राहिले आहे.

शिरोळ तालुक्याने राज्यासह जिल्ह्याचे नेतृत्व केले आहे. जिल्ह्यातील सर्वच शिखर संस्थांचे अध्यक्षपद ठरविण्याचे काम या तालुक्यानेच केले आहे. स्व. रत्नाप्पाण्णा कुंभार यांनी ज्यांना राजकारणात आणले ते आज जिल्ह्याचे नेतृत्व करीत आहेत. मात्र, ज्यांचे बोट धरून राजकारणात आले ते नेतेच आज स्व. कुंभार यांच्या जन्म व कर्मभूमीला विसरले आहेत.

चार नद्या असणारा शिरोळ तालुका हिरवागार असून, शेतीला जोड म्हणून दुग्ध व्यवसाय आहे. गोकुळचा सॅटेलाईट डेअरी प्रकल्पही तालुक्यात आहे. मात्र, गेल्या वीस वर्षांत सहकारापासून काहीसा तालुका दुरावला असल्याने ठरावधारकांची संख्या कमी आहे. यामुळेच दोन्ही आघाड्यांनी शिरोळ तालुक्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते.

Web Title: Shirol taluka deprived in Gokul elections