कोल्हापुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याची पिस्तुलाची न्यायालयात एन्ट्री, पोलिसांनी केली अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 19:22 IST2025-07-15T19:21:33+5:302025-07-15T19:22:04+5:30
वाठारचे सुरेश नरके अटकेत, पिस्तूल जप्त

कोल्हापुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याची पिस्तुलाची न्यायालयात एन्ट्री, पोलिसांनी केली अटक
कोल्हापूर : सुनावणीसाठी जिल्हा न्यायालयात गेलेला पक्षकार सुरेश संभाजी नरके (वय ४२, रा. वाठार तर्फे वडगाव, ता. हातकणंगले) हा थेट कमरेला पिस्तूल लावून न्यायाधीशांसमोर पोहोचला. हा प्रकार लक्षात येताच न्यायालयात ड्युटीवर असलेले पोलिस कॉन्स्टेबल संजय रघुनाथ पारळे यांनी नरके याला बाहेर बोलवून त्याच्याकडील दीड लाख रुपये किमतीचे पिस्तूल जप्त केले. हा प्रकार सोमवारी (दि. १४) सकाळी साडेअकराच्या सुमारास घडला. न्यायालयात कोणतेही शस्त्र घेऊन जाण्यास बंदी असताना थेट पिस्तूल घेऊन आलेला पक्षकार सापडल्याने खळबळ उडाली. त्याला पोलिसांनी अटक केली.
शाहूपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेश नरके याने जमिनीच्या वादातून जून २०१७ मध्ये पेठ वडगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला होता. त्या खटल्याची सुनावणी सोमवारी न्यायाधीश एस. एस. तांबे यांच्यासमोर होती. त्यासाठी सकाळी साडेअकराच्या सुमारास नरके न्यायालयात पोहोचला. वारंवार कमरेला हात लावत तो कोर्टरूममध्ये गेला.
संशय आल्याने ड्युटीवरील कॉन्स्टेबल संजय पारळे यांनी नरके याला बाहेर बोलवले. अंगझडतीत त्याच्याकडे कमरेला लावलेले पिस्तूल मिळाले. पारळे यांनी पिस्तूल जप्त करून याची माहिती शाहूपुरी पोलिसांना दिली. उपनिरीक्षक अनिकेत कुंडले यांनी तातडीने पोहोचून नरके याला ताब्यात घेतले. मनाई आदेशाचा भंग करून पिस्तूल घेऊन न्यायालयात गेल्याबद्दल पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला.
पोलिसांनाही शस्त्र बाहेर ठेवावे लागते
न्यायालयात कोणत्याही प्रकारचे शस्त्र आणि ज्वालाग्राही पदार्थ घेऊन जाण्यास परवानगी नसते. सुनावणीसाठी जाणारे पोलिसही त्यांच्याकडील शस्त्र बाहेर जमा करून आत जातात. कमरेला पिस्तूल लावून पक्षकार थेट कोर्ट रूममध्ये पोहोचल्याने सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
परवाना रद्द होणार
नरके याच्याकडे शस्त्र परवाना आहे. त्याने २०२२ मध्ये घेतलेल्या शस्त्र परवान्याची मुदत डिसेंबर २०२८ पर्यंत आहे. शस्त्र परवान्याच्या अटी आणि नियमांचा भंग केल्याने त्याचा परवाना रद्द व्हावा, अशी शिफारस जिल्हाधिकाऱ्यांना करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.