श्रावण सोमवारी दुष्काळग्रस्तांच्या मुखात अन्न

By Admin | Updated: September 1, 2015 00:26 IST2015-09-01T00:26:47+5:302015-09-01T00:26:47+5:30

हिंदू युवा प्रतिष्ठानचे दातृत्व : पाहुणचाराने त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद द्विगुणीत

Shawn food on the mouth of drought victims on Monday | श्रावण सोमवारी दुष्काळग्रस्तांच्या मुखात अन्न

श्रावण सोमवारी दुष्काळग्रस्तांच्या मुखात अन्न

कोल्हापूर : दुष्काळाने होरपळणाऱ्या औरंंगाबाद जिल्ह्यातील सात दुष्काळग्रस्त कुटुंबांना श्रावण सोमवारी जेवण देऊन हिंदू युवा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यासोबत उपवास सोडला. त्यांच्या दातृत्वाने या कुटुंबांचा ऊर भरून आला.
मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्यातील मुंगी पैठण, वाळुंज, आदी भागातील दुष्काळग्रस्त कुटुंबे व्यवसाय व पोटापाण्याच्या निमित्ताने कोल्हापुरात आली आहेत. सध्या जिल्ह्यात चोरांच्या अफवेचे पेव फुटले आहे. त्यामुळे व्यवसायाने लोहार असणाऱ्या या समाजाचे ग्रामीण भागात फिरणे मुश्कील झाले आहे. त्यांच्याकडे संशयाने पाहिले जात आहे. त्यामुळे या कुटुंबांनी रंकाळा परिसरातील राज कपूर पुतळ्यासमोरील उद्यानाशेजारी वास्तव्य केले आहे. गेल्या १५ दिवसांपासून ही कुटुंबं इथे आहेत. शेती अवजारे व लोहार काम करून त्यांचा उदरनिर्वाह सुरू आहे. भटकंती नसल्याने व्यवसायावर परिणाम होऊन प्रसंगी अर्धपोटी रहावे लागत आहे. त्यामुळे त्यांचे दु:ख हलके करून त्यांना आधार देण्यासाठी हिंदू युवा प्रतिष्ठानने रंकाळा येथील उद्यानात या कुटुंबीयांसमवेत श्रावण सोमवारचा उपवास सोडण्याचा उपक्रम राबविला. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अशोक देसाई, जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत दुष्काळग्रस्त सात कुटुंबांसमवेत दुपारी श्रावण सोमवारचा उपवास सोडण्यात आला. यावेळी संजय ढाले, महादेव कुकडे, ज्ञानदेव पुंगावकर, महेश इंगवले, रामभाऊ लगारे, समीर वर्णे, अशोक साळोखे, माधव कुंभोजकर, रामदास पडूळकर, भानुदास पडूळकर, गुलाबराव पडूळकर उपस्थित होते.

हे आपलेच बांधव आहेत. त्यांच्यावर दुष्काळाचे संकट आल्याने ते इथे आले आहेत. त्यांना आधाराची गरज आहे. त्यांना पोटभर अन्न मिळावे, यासाठी आम्ही श्रावण सोमवारी त्यांना गोडधोड अन्न खायला घालून त्यांच्यासोबत उपवास सोडला व त्यांना आधार देण्याचे काम केले. आम्ही नेहमीच त्यांच्या पाठीशी आहोत. त्यांना ओळखपत्र देण्यासाठी लवकरच पोलीस प्रशासनाला भेटणार आहोत. -अशोक देसाई, अध्यक्ष, हिंदू युवा प्रतिष्ठान

Web Title: Shawn food on the mouth of drought victims on Monday