कोल्हापूरच्या पोरी जगात भारी; शांभवी, सुहानीने गाजवली डर्ट ट्रॅक स्पर्धा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 13:47 IST2025-11-27T13:46:21+5:302025-11-27T13:47:57+5:30
अतिशय धोकादायक, जीवाची बाजी लावत बुलेट रायडिंग, राष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी

कोल्हापूरच्या पोरी जगात भारी; शांभवी, सुहानीने गाजवली डर्ट ट्रॅक स्पर्धा
भीमगोंडा देसाई
कोल्हापूर : अतिशय धोकादायक, जीवाची बाजी लावत बुलेट रायडिंग करून कोल्हापूरच्या दोन मुलींनी गोव्यात झालेल्या राष्ट्रीय पातळीवरील डर्ट ट्रॅक स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे. पदकांची लयलूट करून आम्ही कोल्हापुरी देशात भारी असल्याचे दाखवून दिले आहे. शांभवी राहुल भोसले, सुहानी गौरव पाटील असे त्या मुलींची नावे आहेत. आतापर्यंत केवळ पुरुषांची मुक्तेदारी असलेल्या रायडिंग स्पर्धेत शांभवी या नोकरी करीत तर सुहानी विद्यार्थी असूनही चांगली कामगिरी करून आम्ही मुलीही कशात कमी नाही, हे दाखवून दिले आहे.
गोव्यात हिल क्लाइंब रायडिंगमध्ये रस्ता नसलेल्या डोंगरात तर डर्ट ट्रक चिखल आणि मातीमध्ये स्पर्धा घेतली जाते. दोन्ही स्पर्धेत अपघात झाला तर हात, पाय मोडतात. हेल्मेट असले तरी मानेला जबर मार लागतो. यामुळे या दोन्ही स्पर्धेत सहभाग घेणे म्हणून जीवाची बाजी लावले, असेच समजले जाते. तरीही ३५० सीसीच्या बुलेटसारख्या अवजड दुचाकीवरून या दोघींनी डर्ट ट्रॅकमध्ये यश मिळवले आहे. सुहानी तर दीड किलोमीटर रस्ता नसलेल्या डोंगरातील हिल क्लाइंबमध्ये थरारक स्पर्धा जिंकली आहे.
सुहानी प्रतिभानगरमध्ये राहते. तिचे पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले आहे. वडिलांकडून त्यांनी रायडिंगचा बाळकडू घेतला. वडीलही डर्ट ट्रॅकमध्ये नेहमी भाग घेत असल्याने सुहानीलाही याची आवड लागली. यांनीही सन २०१९ पासून डर्ट ट्रॅकच्या स्पर्धेत त्या भाग घेतात.
शांभवी या कंदलगाव येथे राहतात. इंटेरिअर डिझायनर म्हणून त्या नोकरी करतात. नोकरी करीत त्या छंद म्हणून रायडिंग करतात. शालेय वयातच त्यांनी दुचाकी शिकली. सन २०१९ पासून डर्ट ट्रॅक आणि रेसिंगच्या स्पर्धेत सहभाग घेतात. चिखलात जिवघेणी वळणे पार करून त्यांनी गोव्याचा डर्ट ट्रॅक यशस्वीपणे पूर्ण करून त्यांनी पदक मिळवले.
स्पर्धेत धोका अधिक पण...
डर्ट ट्रॅक, हिल क्लाइंब साहसी स्पर्धा असल्या तरी मुलीही यामध्ये यश मिळवू शकतात. नियमित सराव असेल तर यश मिळते. यामध्ये धोका अधिक असतो, पण थरार अनुभवता येतो. यामध्ये करिअरलाही संधी आहेत, असे शांभवी आणि सुहानी सांगतात.