बुलंद आवाजाचे शाहीर कुंतीनाथ करके यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:24 IST2021-03-23T04:24:30+5:302021-03-23T04:24:30+5:30

हेरले (जि.कोल्हापूर) : ‘गणूचा गोंदा...सोडून धंदा, रिकामा गावात फिरतोय रं.. अन्‌ आईकडे रुपाया मागतोय रं..’ असे बदलत्या समाजव्यवस्थेतील ...

Shahir Kuntinath Karke of loud voice passed away | बुलंद आवाजाचे शाहीर कुंतीनाथ करके यांचे निधन

बुलंद आवाजाचे शाहीर कुंतीनाथ करके यांचे निधन

हेरले (जि.कोल्हापूर) : ‘गणूचा गोंदा...सोडून धंदा, रिकामा गावात फिरतोय रं.. अन्‌ आईकडे रुपाया मागतोय रं..’ असे बदलत्या समाजव्यवस्थेतील वास्तवतेवर विनोदी रचनेतून प्रकाश टाकणारे शाहीर, कवी कुंतीनाथ देवेंद्र करके (वय ८५) यांचे सोमवारी पहाटे हृदयविकाराने निधन झाले. त्यांनी शाहिरीतून राज्यासह देशभरात समाजप्रबोधन केले. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील शाहिरी परंपरेतील हिरा हरपला, अशी भावना व्यक्त झाली.

त्यांनी अनेक मराठी चित्रपटासाठी गीतलेखन केले होते. हेरले (ता. हातकणंगले) येथील गरीब शेतकरी कुटुंबात १० एप्रिल १९३६ रोजी करके यांचा जन्म झाला. पदवीपर्यंतचे शिक्षण घेत असताना स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉ. बापूजी साळुंखे यांचा त्यांना सहवास लाभला. शिक्षण पूर्ण होताच ते स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेत शिक्षक म्हणून रूजू झाले. ज्ञानदानाचे कार्य करत असताना त्यांनी शाहिरी कलेचीही जोपासना केली, आजवर अनेक विषयांवर, व्यक्तिमत्त्वावर, इतिहासावर रचलेले आणि त्यांनी गायलेले पोवाडे अजरामर झाले आहेत. उमेदीच्या काळात त्यांचे शाहिरी झंकार हे शाहिरी काव्य तर, ‘येडें पेरलं खुळे उगवलं’ हे विनोदी नाटक प्रसिद्ध झालं होतं. स्वत: शेतकरी कुटुंबात घडलेलं पिंड असल्याने त्यांनी मातीशी कधी नाळ तोडली नाही, सेवानिवृत्तीनंतर शेतीवर लक्ष दिले होते.

-----------------------------------------------

गीतकार.... डी. लिट्‌.

करके यांनी पाझर, चैत्रपालवी, कांचनकुंम, जलधारा हे काव्यसंग्रह आणि कथा ही महावीरांची हा चरित्रग्रंथ लिहिला आहे. त्यांची अनेक देवतांच्या गाण्यांची कॅसेट्स प्रसिद्ध झाली आहेत. गंगू बाजारला जाते,औदा लगीन करायचं, बोला दाजिबा, सख्या सजना, बायको आली बदलून, अन्याय, प्रतिकार, सुळावरची पोळी, सोंगाड्या या चित्रपटांची गाणीही त्यांनी लिहिली. त्यांना शासनाचा दलितमित्र पुरस्कार मिळाला होता. करके यांच्या कार्याची दखल घेऊन कोल्हापुरातील डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाने त्यांना डॉक्टर ऑफ लिटरेचर (डी. लिट्‌.) जाहीर केले होते. ती पदवी १७ फेब्रुवारी २०२१ रोजी झालेल्या विद्यापीठाच्या नवव्या दीक्षांत समारंभात कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्या हस्ते बहाल करण्यात आली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे.

-----------------------------------------------

फोटो: २२ कुंतीनाथ करके

Web Title: Shahir Kuntinath Karke of loud voice passed away