Kolhapur: एक कोटीच्या डिजिटल फसवणुकीतील सात लाख पन्हाळ्यातील आइस्क्रीम विक्रेत्याच्या बँक खात्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 11:56 IST2026-01-09T11:55:25+5:302026-01-09T11:56:06+5:30
एजंटसह दोघांना अटक, मुंबई सायबर पोलिसांची कारवाई

Kolhapur: एक कोटीच्या डिजिटल फसवणुकीतील सात लाख पन्हाळ्यातील आइस्क्रीम विक्रेत्याच्या बँक खात्यात
कोल्हापूर/पन्हाळा : मुंबईत एका व्यावसायिकाची एक कोटी १० लाखांची ऑनलाइन फसवणूक झाली असून, त्यातील सात लाख रुपये पन्हाळ्यातील आइसक्रीम विक्रेत्याच्या बँक खात्यात आले आहेत. या प्रकरणी मुंबईतील वेस्ट सायबर पोलिसांनी पन्हाळ्यातील आइसक्रीम विक्रेता दस्तगीर शमशुद्दीन काझी (वय ५२) आणि त्याला बँक खाते काढून देणारा एजंट चेतन मुकुंद पाडळकर (२९, रा. बापट कॅम्प, कोल्हापूर) या दोघांना अटक केली. ही कारवाई बुधवारी (दि. ७) रात्री उशिरा केली.
मुंबई वेस्ट सायबर पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक नितीन गच्चे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील विमलकुमार गोयंका यांना एका अनोळखी व्यक्तीने व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये घेतले. त्यानंतर शेअर बाजारात पैसे गुंतवून तिप्पट मोबदला देण्याचे आमिष दाखवले. त्यांच्याकडून गुंतवणुकीसाठी वेळोवेळी ऑनलाइन एक कोटी दहा लाख रुपये घेतले होते.
त्यानंतर ट्रेडिंग कंपनीच्या बनावट ॲपवर त्यांच्या खात्यात तिप्पट रक्कम जमा झाल्याचे भासवले. गोयंका यांनी खात्यातून तीन लाख रुपये काढून पैसे जमा झाल्याची खात्री केली. त्यानंतर काही दिवसांत त्यांचे अकाउंट ब्लॉक झाले. खात्यातील रक्कम काढल्यास कर भरावा लागेल, अशी भीती त्यांना घातली गेली. अखेर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सायबर पोलिसांकडे फिर्याद दिली.
फिर्यादी गोयंका यांना आलेले मोबाइल नंबर बंद होते. गोयंका यांनी गुंतवणुकीसाठी रक्कम पाठविलेल्या बँक खात्यांची माहिती घेतली असता पोलिसांना त्यात पन्हाळ्यातील काझी बंधूंचे खाते मिळाले. त्यावरून तपास अधिकारी गच्चे यांनी बुधवारी सायंकाळी पन्हाळ्यात पोहोचून दस्तगीर काझी आणि इस्माईल काझी यांना ताब्यात घेतले. फसवणुकीतील सात लाख रुपये जमा झालेले बँक खाते दस्तगीर याचे असल्याचे स्पष्ट होताच त्याला अटक केली. तसेच इस्माईल याला नोटीस देऊन सोडले.
एजंटही सापडला
दस्तगीर काझी याच्या चौकशीतून बँक खाते काढून देणाऱ्या एजंटचेही नाव समोर आले. पोलिसांनी तातडीने बापट कॅम्प येथील एजंट चेतन पाडळकर याला अटक केली. त्याने आणखी काही जणांना बँक खाती काढून दिली आहेत. या सर्व बँक खात्यांचा वापर ऑनलाइन फसवणुकीसाठी झाल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यानुसार तपास सुरू असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक गच्चे यांनी दिली.
कंबोडिया, मॅनमारमध्ये धागेदोरे
ऑनलाईन फसवणुकीचे रॅकेट मोठे असून, त्याचे धागेदोरे कंबोडिया, मॅनमारपर्यंत असल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली. रॅकेटमधील एकूण ४० संशयितांची नावे निष्पन्न झाली आहेत. यात देश-विदेशातील संशयितांचा समावेश आहे. फसवणुकीच्या रकमा वर्ग करण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांच्या बँक खात्यांचा वापर झाल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले.
मुंबईतील व्यावसायिकाला गुंतवणुकीवर जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून झालेल्या फसवणुकीचा तपास कोल्हापूरपर्यंत पोहोचला आहे. दोघांना अटक झाली असून, आणखी काही संशयितांची नावे समोर येण्याची शक्यता आहे. - नितीन गच्चे - सहायक पोलिस निरीक्षक, मुंबई वेस्ट सायबर पोलिस ठाणे