Local Body Election: मतमोजणी वेटिंगवर.. प्रशासकीय यंत्रणा ऑक्सिजनवर; 'ही' घ्यावी लागणार खबरदारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 12:04 IST2025-12-03T12:03:48+5:302025-12-03T12:04:26+5:30
सुरक्षेसाठी वाढवले सीसीटीव्ही कॅमेरे

Local Body Election: मतमोजणी वेटिंगवर.. प्रशासकीय यंत्रणा ऑक्सिजनवर; 'ही' घ्यावी लागणार खबरदारी
कोल्हापूर : जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपंचायतींसाठी मतदान झाल्यानंतर आता निकालासाठी इच्छुक उमेदवारांसह नागरिकांनाही २१ तारखेपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. निवडणुकीसाठी एकूण ३१८ मशीन वापरण्यात आले आहेत, मतमाेजणी २० दिवसांनी पुढे गेल्याने आता ईव्हीएम मशीन ठेवण्यात आलेल्या स्ट्राँग रूमची सुरक्षा वाढवण्यात आली असून सीसीटीव्ही कॅमेरे, अतिरिक्त पोलिस बंदोबस्त देण्यात आला आहे.
जिल्ह्यातील १० नगरपालिका, ३ नगर पंचायतींसाठी मंगळवारी मतदान झाले. आज, बुधवारी मतमोजणी होणार होती. मात्र नागपूर खंडपीठाच्या निकालानंतर निवडणूक आयोगाने राज्यातील नगरपालिकांच्या मतमोजणीची तारीख पुढे ढकलल्याने मंगळवारी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी देखील २१ तारखेला ठेवली आहे.
वाचा : कोल्हापूर जिल्ह्यात ईर्ष्येने ७८.८७ टक्के मतदान; काही ठिकाणी हमरीतुमरी, बाचाबाची, पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज
या निर्णयामुळे ईव्हीएम मशीन सुरक्षित ठेवण्याचा अतिरिक्त ताण यंत्रणेवर पडला आहे. ईव्हीएम मशीन ठेवण्यात आले आहेत त्या शेजारीच मतमोजणी होणार असून स्ट्राँग रूमच्या सुरक्षेसाठी एसआरपीएफचे जवान व पोलिस तैनात ठेवण्यात आले आहे. सीसीटीव्ही यंत्रणा, वेळोवेळी अधिकाऱ्यांकडून सुरक्षेची तपासणी केली जाणार आहे.
ही घ्यावी लागणार खबरदारी
- गोडाऊनच्या साठवणूक व व्यवस्थापनासाठी जबाबदार अधिकाऱ्याची नियुक्ती
- स्ट्राँग रूम सुरक्षा उपकरणे जसे की सीसीटीव्ही, सुरक्षा अलार्म, फॅन, अग्निशमन यंत्रणा, बॅरेकेटिंग
- मतदान यंत्र ठेवण्यात आलेल्या गोडाऊनसाठी २४ तास सशस्त्र चोख सुरक्षा व्यवस्था
स्विच बंद...नाहीतर बॅटरी लो...
ईव्हीएम मशीन चार्जिंगवर चालतात. त्यामुळे मतदान पूर्ण झाल्यानंतर मतदान यंत्रांवरील ऑन ऑफ स्विच लक्षपूर्वक बंद करणे आवश्यक असते. निवडणूक निर्णय अधिकारी मतदान यंत्र पेटीत ठेवण्यापूर्वी त्याचा स्विच बंद असल्याची खात्री करूनच ते पेटीत ठेवावे लागतात. अन्यथा बॅटरी संपण्याची शक्यता असते. तरीही मतमोजणीच्या वेळी लो बॅटरी, असा मॅसेज मतदान यंत्र दाखवित असल्यास आयोगाच्या नियमानुसार चार्जिंग करून मतमोजणी पूर्ण करावे लागते.
मतमोजणी सेटअपचा खर्च वाढला...
आज, बुधवारी मतमाेजणी होणार म्हणून सर्व नगरपालिका, नगरपंचायतींच्या ठिकाणी स्ट्राँग रूमच्या शेजारीच मतमोजणीची तयारी केली होती. कर्मचारी बसण्यासाठी टेबल, खुर्च्या, बॅरिकेडिंग, जाळ्या लावणे, फॅन, राजकीय प्रतिनिधींची सोय, निकाल जाहीर करण्यासाठीची साऊंड सिस्टीम अशी भली मोठी यंत्रणा सज्ज ठेवली होती. आता हा सगळा सेटअप काढून पुन्हा मतमोजणीच्या एक दिवस आधी लावावा लागणार आहे, तो खर्च वाढला आहे.
द्विस्तरीय सुरक्षा व्यवस्था
ईव्हीएम मशीनच्या सुरक्षेसाठी एसआरपीएफ व स्थानिक पोलिस अशी द्विस्तरीय सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व १३ स्ट्राँग रूमबाहेर २४ तास १६ ते ३० सशस्त्र पोलिस, जवान अशी दोन पथके तैनात असतील. पोलिस उपअधीक्षक, पोलिस निरीक्षक वेळोवेळी याची तपासणी करतील. तसेच हवालदार, दोन अंमलदार असणार आहेत. एवढा मोठा पोलिस बंदोबस्त मतमोजणीपर्यंत ठेवला जाणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी दिली.