वसुलीसाठी कुंभोजात सरपंच, उपसरपंच मिळकतधारकांच्या दारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:37 IST2021-02-23T04:37:44+5:302021-02-23T04:37:44+5:30

दोन हजार तीनशेहून अधिक नळकनेक्शन धारकांकडून पाणीपट्टीपोटी मिळणाऱ्या उत्पन्नाचा खर्चाची मेळ घालताना ग्रामपंचायत मेटाकुटीला आली आहे. त्यातच घरफाळा व ...

Sarpanch, Deputy Sarpanch in Kumbhoja for recovery | वसुलीसाठी कुंभोजात सरपंच, उपसरपंच मिळकतधारकांच्या दारी

वसुलीसाठी कुंभोजात सरपंच, उपसरपंच मिळकतधारकांच्या दारी

दोन हजार तीनशेहून अधिक नळकनेक्शन धारकांकडून पाणीपट्टीपोटी मिळणाऱ्या उत्पन्नाचा खर्चाची मेळ घालताना ग्रामपंचायत मेटाकुटीला आली आहे. त्यातच घरफाळा व पाणीपट्टीची चालूसह थकबाकी तीन कोटींच्या घरात पोहोचल्याने नूतन ग्रामपंचायत पदाधिकारी तसेच नवीन ग्रामविकास अधिकारी ए. एस. कठारे यांच्यासमोर वसुलीचे मोठे आव्हान घेऊन सुमारे वीस हजार लोकवस्तीचा गावगाडा हाकणे अवघड बनले आहे.

प्राप्त परिस्थितीत कमाल वसुलीचे उद्दिष्ट घेऊन प्रशासनास बळ देण्यासाठी सरपंच माधुरी घोदे, उपसरपंच दाविद घाटगे तसेच सदस्यांनी वसुलीसाठी स्वतः मिळकतधारकांपर्यंत जाण्याचे नियोजन केले आहे. घरफाळा, पाणीपट्टी भरण्यास २३ फेब्रुवारीपर्यंतची मुदत दिली आहे. मुदतीनंतर थकबाकीदारांची पाणीजोडणी तोडण्याची तसेच तद्नंतर ही विनंती करून ही वसुलीस प्रतिसाद न देणाऱ्या मिळकतदारांवर जप्तीची कटू कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी ग्रामपंचायत स्तरावर सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामविकास अधिकारी यांचा सहभाग असणारे वसुली पथक स्थापन करण्यात आले असून वसुली मोहिमेस धडकपणे सुरुवात झाली आहे.

तथापि यापूर्वीसारखा कारवाईचा केवळ धाक न दाखवता जुन्या आणि मोठ्या थकबाकीदारांवर ठोस कारवाई झाल्यासच ग्रामपंचायतीला वसुली कामी अपेक्षित यश येईल. अन्यथा ये रे माझ्या मागल्या अशा प्रतिक्रिया नियमित कर भरणाऱ्या मिळकतधारकांतून ऐकायला मिळत आहेत.

फोटो ओळी-

कुंभोज (ता. हातकणंगले) येथे थकित घरफाळा व पाणीपट्टी वसुलीमोहिमेत कर्मचाऱ्यांसोबत सरपंच माधुरी घोदे, उपसरपंच दाविद घाटगे, सदस्य तसेच ग्रामविकास अधिकारी ए एस. कठारे सहभागी झाले होते.

Web Title: Sarpanch, Deputy Sarpanch in Kumbhoja for recovery