कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मंदिरात व्हीआयपी दर्शन बंद होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 13:37 IST2025-09-03T13:36:28+5:302025-09-03T13:37:45+5:30

सर्वच भाविकांना सुलभ आणि कमी वेळेत दर्शन घेता यावे, यासाठी नवनवीन योजना राबवण्याचा संकल्प

Sant Sadguru Shri Balumama Devalaya Trust in Adamapur Kolhapur district has taken a significant decision to stop VIP darshan | कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मंदिरात व्हीआयपी दर्शन बंद होणार

कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मंदिरात व्हीआयपी दर्शन बंद होणार

वाघापूर : श्रीक्षेत्र आदमापूर (ता. भुदरगड) येथील संत सद्गुरु श्री बाळूमामा देवालय ट्रस्टने ''व्हीआयपी'' दर्शन बंद करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. बाळूमामाच्या समाधीचे पावित्र्य जपण्यासाठी गाभारा आणि त्यासमोरील विशेष दर्शन व्यवस्था बंद करण्यात आली असून, सर्व भाविकांना समान वागणूक देण्यात येणार आहे.

यापुढे सर्व भाविकांना रांगेतून थेट दर्शन, मुखदर्शन आणि पायरी दर्शन या तीन पर्यायांमधूनच दर्शन घ्यावे लागेल. दर्शन मंडपातून सुरू होणाऱ्या रांगेतून भाविकांना बाळूमामांच्या समाधीचे व चांदीच्या पादुकांचे दर्शन घेता येईल. मंदिराच्या पूर्व बाजूने मुखदर्शन व पायरी दर्शनाची सोय केली असून, दोन्ही बाजूंना भंडारा लावण्याची व श्रीफळ, प्रसाद अर्पण करण्याची व्यवस्था आहे.

सर्वच भाविकांना सुलभ आणि कमी वेळेत दर्शन घेता यावे, यासाठी नवनवीन योजना राबवण्याचा संकल्प असल्याची माहिती देवालय समितीचे अध्यक्ष धैर्यशील भोसले, कार्याध्यक्ष शामराव होडगे व सचिव रावसाहेब कोणकेरी यांनी दिली.

पुतळे ठेवण्यास बंदी

आदमापूर परिसरात काही ठिकाणी दुकानासमोर बाळूमामांचे पुतळे ठेवण्यात येत आहेत. त्यामुळे मामांच्या प्रतिमेला बाधा पोहोचू शकते. बाळूमामांच्या प्रतिमेचे पावित्र्य राखले जावे. त्यासाठी असे पुतळे ठेवण्यास देवस्थान समितीने बंदी घालण्याचा निर्णयही घेतला आहे.

Web Title: Sant Sadguru Shri Balumama Devalaya Trust in Adamapur Kolhapur district has taken a significant decision to stop VIP darshan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.