तोतया अधिकाऱ्याकडून दारू तस्करी; १८ कर्मचारी, अधिकाऱ्यांची चौकशी; सांगलीतील अधीक्षकांकडून १० जणांचे जबाब पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 12:01 IST2025-06-17T12:00:40+5:302025-06-17T12:01:30+5:30

कोल्हापूर : गोवा बनावटीच्या दारूची तस्करी करताना सापडलेला तोतया अधिकारी नितीन दिलीप ढेरे (वय ३३, रा. जाधववाडी, कोल्हापूर ) ...

Sangli Superintendent of State Excise interrogates 18 employees, officers from Kolhapur in case of liquor smuggling by an impersonator officer | तोतया अधिकाऱ्याकडून दारू तस्करी; १८ कर्मचारी, अधिकाऱ्यांची चौकशी; सांगलीतील अधीक्षकांकडून १० जणांचे जबाब पूर्ण

तोतया अधिकाऱ्याकडून दारू तस्करी; १८ कर्मचारी, अधिकाऱ्यांची चौकशी; सांगलीतील अधीक्षकांकडून १० जणांचे जबाब पूर्ण

कोल्हापूर : गोवा बनावटीच्या दारूची तस्करी करताना सापडलेला तोतया अधिकारी नितीन दिलीप ढेरे (वय ३३, रा. जाधववाडी, कोल्हापूर) याच्या संपर्कातील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर कार्यालयातील १८ कर्मचारी आणि अधिका-यांची चौकशी सुरू झाली. या विभागातील सांगलीचे अधीक्षक प्रदीप पोटे यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. या चौकशीतून कर्मचारी आणि अधिका-यांचा दारू तस्करीत सहभाग आहे की नाही हे स्पष्ट होणार असल्याने याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

शासकीय कार्यालयांमध्ये खासगी वाहन चालक म्हणून काम करणारा नितीन ढेरे याने शासकीय गणवेश आणि कारसाठी अंबर दिव्याचा वापर करून अडीच लाखांच्या गोवा बनावटीच्या दारूची तस्करी केली होती. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने २३ मार्च रोजी पहाटे नेसरी ते गडहिंग्लज मार्गावर महागावच्या हद्दीत सापळा रचून तोतया अधिकारी ढेरे आणि त्याचा साथीदार सेवानिवृत्त जवान शिवाजी आनंदा धायगुडे (५७, रा. अंदोरी, ता. खंडाळा, जि. सातारा) यांना अटक केली होती. ढेरे याच्या चौकशीत उत्पादन शुल्क विभागातील अनेक अधिकारी आणि कर्मचारी त्याच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली.

काही अधिका-यांच्या पाठबळामुळेच तो तस्करी करीत असल्याची शक्यता वर्तवली जात होती. उत्पादन शुल्क विभागाच्या वरिष्ठ अधिका-यांनी याची गंभीर दखल घेऊन कोल्हापूर कार्यालयातील १८ जणांच्या चौकशीचा आदेश काढला. यात काही वरिष्ठ अधिका-यांचाही समावेश आहे. चौकशी अधिकारी सांगलीतील अधीक्षक प्रदीप पोटे यांनी १८ पैकी १० जणांचे जबाब नोंदवले आहेत. उर्वरित जबाब नोंदवून अहवाल वरिष्ठ कार्यालयात सादर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

काहींचे धाबे दणाणले

तस्कर ढेरे हा मोबाइलवरून अनेक अधिकारी आणि कर्मचा-यांच्या संपर्कात होता. दारू तस्करीच्या दोन दिवसातही त्याने काही कर्मचा-यांना फोन केले होते. यावरूनच संशय बळावल्याने कर्मचारी आणि अधिका-यांची चौकशी सुरू आहे. यातून महत्त्वाचे पुरावे समोर येणार असल्याने उत्पादन शुल्क विभागातील काही अधिकारी आणि कर्मचा-यांचे धाबे दणाणल्याचे वरिष्ठ अधिका-यांनी सांगितले.

Web Title: Sangli Superintendent of State Excise interrogates 18 employees, officers from Kolhapur in case of liquor smuggling by an impersonator officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.