Kolhapur Crime: नोटांऐवजी पाठवले कोऱ्या कागदांचे बंडल; सांगलीच्या व्यापाऱ्याची ५० लाखांची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 12:20 IST2025-08-22T12:19:06+5:302025-08-22T12:20:16+5:30
शाहूपुरी पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हा

Kolhapur Crime: नोटांऐवजी पाठवले कोऱ्या कागदांचे बंडल; सांगलीच्या व्यापाऱ्याची ५० लाखांची फसवणूक
कोल्हापूर : व्यापारासाठी दिल्लीत तुमच्या मित्रांकडून मला ५० लाख रुपये पाठवा. मी तुम्हाला कोल्हापुरातून पैसे पोहोचवतो, असे म्हणत तीन अनोळखी व्यक्तींनी सांगलीतील बेदाणे व्यापारी राजेश लक्ष्मीनारायण मुंदडा (वय ५४, रा. अंबाईनगर, सांगली) यांना ४९ लाख ९० हजारांचा गंडा घातला.
खऱ्या नोटांखाली त्याच आकाराचे कोरे कागद ठेवून त्यांनी फसवणूक केली. हा प्रकार सात ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास एलेक्झा टॉवरमध्ये घडला. मुंदडा यांच्या फिर्यादीनुसार शाहूपुरी पोलिसांनी बुधवारी (दि. २०) तीन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल केला.
शाहूपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगलीतील बेदाणे व्यापारी मुंदडा यांना ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात राहुल नावाच्या व्यक्तीने मोबाइलवर कॉल केला. दिल्लीतून बोलत असल्याचे सांगत त्याने बेदाणे खरेदीच्या बहाण्याने ओळख वाढवली. त्यानंतर व्यापारासाठी दिल्लीत ५० लाख रुपयांची गरज असल्याचे सांगितले. दिल्लीतील तुमच्या व्यापारी मित्रांकडून ५० लाख द्यायची व्यवस्था करा. मी तुम्हाला कोल्हापुरातील मित्राकडून ५० लाख रुपये द्यायची व्यवस्था करतो, असे त्याने सांगितले.
मुंदडा यांनी त्याच्यावर विश्वास ठेवून दिल्लीतील एका व्यापारी मित्राकडून ५० लाखांची रोकड पोहोचवली. त्याच दिवशी दुपारी साडेतीनच्या कोल्हापुरातील एलेक्झा टॉवर येथे एका व्यक्तीकडून ५० लाख घेण्यास सांगितले. त्याचा मोबाइल नंबरही दिला.
ठरल्यानुसार मुंदडा यांचे कर्मचारी पैसे घेण्यासाठी कोल्हापुरात पोहोचले. त्यांनी एलेक्झा पार्कमध्ये एका व्यक्तीकडून पैसे घेतले. सर्व रोकड प्लास्टिकच्या कागदात बांधली होती. कागद बाजूला सारून बँकेचा शिक्का असलेल्या पावतीसह बंडल एकत्र बांधल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर रक्कम घेऊन कर्मचारी सांगलीत पोहोचले. व्यापारी मुंदडा यांनी नोटांचे बंडल काढून पाहिले असता, त्यात कोरे कागद असल्याचे आढळले.
मोबाइल नंबरवरून शोध
पैशांची मागणी करण्यासाठी आलेल्या मोबाइल नंबरवरून संशयितांची माहिती काढण्याचा प्रयत्न मुंदडा यांनी केला. मात्र, पैसे दिल्यापासून तिन्ही मोबाइल नंबर स्विच ऑफ झाले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी १४ दिवसांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
सीसीटीव्ही फुटेजवरून शोध
फसवणुकीत वापर झालेल्या तीन मोबाइल नंबरची माहिती काढण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. हे तिन्ही नंबर सध्या बंद आहेत. कोऱ्या कागदांच्या नोटांचे बंडल देणारी व्यक्ती एलेक्झा टॉवर येथील सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे. तिचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.