कोल्हापुरात भाजप'ने काढली तिरंगा पदयात्रा, भारतमातेच्या घोषणांनी परिसर दणाणला
By इंदुमती सूर्यवंशी | Updated: May 17, 2025 17:35 IST2025-05-17T17:34:24+5:302025-05-17T17:35:38+5:30
कोल्हापूर : पहलगाम येथील पर्यटकांवर पाक पुरस्कृत दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याला सडेतोड प्रत्युत्तर देत भारतीय सैन्य दलाने अवघ्या दोनच ...

कोल्हापुरात भाजप'ने काढली तिरंगा पदयात्रा, भारतमातेच्या घोषणांनी परिसर दणाणला
कोल्हापूर : पहलगाम येथील पर्यटकांवर पाक पुरस्कृत दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याला सडेतोड प्रत्युत्तर देत भारतीय सैन्य दलाने अवघ्या दोनच दिवसात पाकिस्तानला शरणागती पत्करायला लावली. भारतीय सैन्य दलाच्या या अतुलनीय पराक्रमाला सलाम करत शनिवारी भारतीय जनता पक्षातर्फे शहरातील प्रमुख मार्गावरून तिरंगा पदयात्रा काढली. यावेळी ‘भारत माता की जय, वंदे मातरम्, भारतीय सैन्याचा विजय असो’ अशा घोषणांनी दसरा चौक दणाणून सोडला.
भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दाखवलेल्या पराक्रमाबद्दल देशभरात ठिकठिकाणी तिरंगा पदयात्रांचे आयोजन केले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर शनिवारी सकाळी कोल्हापुरात याचे आयोजन करण्यात आले होते.
दसरा चौकात छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पदयात्रेला सुरूवात झाली. भारतमाता, छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय सैनिक यांच्या पोशाखातील चिमुकल्यांनी यामध्ये सहभाग घेतला. माजी सैनिकांच्या उपस्थितीने पदयात्रेला वेगळ्याच उंचीवर नेले. सर्वांनी तिरंगा ध्वज हाती घेत सैन्याबद्दल प्रोत्साहनपर घोषणा दिल्या. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
खासदार धनंजय महाडिक म्हणाले, भारतीय सैन्याचे मनोबल वाढवण्यासाठी व त्यांचे अभिनंदन करण्यासाठी देशभरात भाजपा तिरंगा पदयात्रा मोठ्या उत्साहात काढत आहे. भारतीय सैन्याचे दाखवलेल्या अतुलनीय पराक्रमाबद्दल नागरिकांच्यावतीने कृतज्ञता व्यक्त करूया. यावेळी आमदार अमल महाडिक, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, नाथाजी पाटील, राजवर्धन निंबाळकर, शौमिका महाडिक, राहुल चिकोडे, महेश जाधव यांच्यासह नागरिक उपस्थित होते.