साहेब सातबारावर नोंद होत नाही, पोलीस तक्रार घेत नाहीत - नागरिकांनी लोकशाही दिनात मांडल्या अडचणी : ३२ अर्ज दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:58 IST2021-02-05T06:58:27+5:302021-02-05T06:58:27+5:30
कोल्हापूर : ‘साहेब जमीन खरेदी करुन कित्येक महिने झाले पण तलाठी सातराबावर नोंद करुन घेत नाही, ऊस तोडणीला आला ...

साहेब सातबारावर नोंद होत नाही, पोलीस तक्रार घेत नाहीत - नागरिकांनी लोकशाही दिनात मांडल्या अडचणी : ३२ अर्ज दाखल
कोल्हापूर : ‘साहेब जमीन खरेदी करुन कित्येक महिने झाले पण तलाठी सातराबावर नोंद करुन घेत नाही, ऊस तोडणीला आला आहे पण रस्ता नाही, वारंवार हेलपाटे मारूनही पोलीस एफआयआर दाखल करुन घेत नाहीत, तलावासाठी माझ्या जागेचे संपादन झाले, पाटबंधारे खात्याचे नाव लागले पण तलावाचा पत्ताच नाही, आता मला जमीन परत माझ्या नावे करुन हवी आहे...’ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारी नागरिकांनी सोमवारी झालेल्या लोकशाही दिनात मांडल्या. कोरोना आणि लॉकडाऊननंतर पहिल्यांदाच झालेल्या लोकशाही दिनात ३२ अर्ज दाखल झाले. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी स्वत: सर्व प्रकरणांमध्ये लक्ष घालून नागरिकांना दिलासा दिला.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महाराणी ताराबाई सभागृहात जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या लोकशाही दिनाला प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवितके, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे, जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख अधिकारी वसंत निकम, तहसीलदार रंजना बिचकर यांच्यासह सर्व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी महसूलशी संबंधित ९, पोलीस अधीक्षक कार्यालय ६, जिल्हा परिषद ४, जिल्हा उपनिबंधक कार्यालय २, साखर सह संचालक १, पंचायत समिती, पन्हाळा १, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय ४, जिल्हा अग्रणी बँक २, महावितरण कार्यालय, प्रदूषण महामंडळ, महापालिका प्रत्येकी एक असे एकूण ३२ अर्ज प्राप्त झाले आहेत. दरम्यान, गतवर्षी झालेल्या लोकशाही दिनात प्राप्त झालेल्या अर्जांचा आढावा यावेळी घेण्यात आला.
-------
फोटो नं ०१०२२०२१-कोल-लोकशाही दिन
ओळ : कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली लोकशाही दिन झाला. यावेळी प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवितके, करमणूक तहसीलदार रंजना बिचकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
---