Kolhapur: कुटुंबाने ओढाताण करून शिकवले, पोराने नाव काढले; मालवेच्या रोहितची इस्रोच्या शास्त्रज्ञपदी झेप
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 16:12 IST2024-12-19T16:11:26+5:302024-12-19T16:12:43+5:30
कोल्हापूर : आई-वडील शेतकरी, त्यामुळे कुटुंबाची परिस्थिती बेताचीच; पण आपल्या मुलाने शिकावे, नाव कमवावे, ही त्यांची मनोमन इच्छा. त्यामुळे ...

Kolhapur: कुटुंबाने ओढाताण करून शिकवले, पोराने नाव काढले; मालवेच्या रोहितची इस्रोच्या शास्त्रज्ञपदी झेप
कोल्हापूर : आई-वडील शेतकरी, त्यामुळे कुटुंबाची परिस्थिती बेताचीच; पण आपल्या मुलाने शिकावे, नाव कमवावे, ही त्यांची मनोमन इच्छा. त्यामुळे कितीही आर्थिक संकटे आली तरी कुटुंबाने शिक्षणासाठी पैसे कमी पडू दिले नाहीत. आई-वडिलांच्या याच संघर्षाला यशाचे कोंदण लावत मालवे (ता. राधानगरी) येथील रोहित विद्या लक्ष्मण पाटील या मुलाने थेट ‘इस्रो’मध्ये शास्त्रज्ञ म्हणून झेप घेतली आहे. मालवेसारख्या आडवळणाच्या गावातील एका मुलाने परिस्थितीवर मात करत मिळवलेले हे यश निश्चितच कौतुकास्पद आहे.
रोहित यांचे प्राथमिक शिक्षण मालवे विद्यामंदिर, बोरवडे हायस्कूल व किसनराव मोरे हायस्कूल सरवडे येथे झाले. तर गारगोटीच्या आयसीआरई कॉलेजमधून त्यांनी मेकॅनिकलमधून इंजिनिअरिंग डिप्लोमा पूर्ण केला. इचलकरंजी येथील शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून त्यांनी याच विषयातून डिग्री पूर्ण केली. काही काळ शिरवळच्या एका कंपनीत नोकरी केल्यानंतर त्यांना स्पर्धा परीक्षेचे वेध लागले. यातून त्यांची ऑइल आणि नॅचरल गॅस या केंद्र सरकारच्या कंपनीमध्ये असिस्टंट इंजिनिअरपदी निवड झाली.
हे करत असताना त्यांनी ‘इस्त्रो’ची परीक्षा दिली. यात एकदा अपयश आले. मात्र, खचून न जाता अभ्यासात सातत्य ठेवल्याने त्यांची ‘इस्त्रो’मध्ये शास्त्रज्ञ म्हणून नुकतीच निवड झाली. त्यांना आई-वडील, चुलते कृष्णात पाटील, जयसिंग पाटील, रघुनाथ पाटील, संग्राम पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
स्वप्नांना कुटुंबाचे बळ
आई-वडिलांनी शिक्षणासाठी एकही रुपया कमी पडू दिला नाही. ज्या-ज्या वेळी गरज लागेल त्या-त्या वेळी त्यांनी पैसे पाठवले. त्यांची यामुळे अनेकदा ओढाताण झाली असेल; मात्र ते त्यांनी मला कधीच जाणवू दिले नाही. माझ्या स्वप्नांना बळ देण्याचे काम कुटुंबाने केले असल्याची भावना रोहित पाटील यांनी व्यक्त केली.