Kolhapur Crime: धावत्या ट्रॅव्हल्समध्ये सव्वा कोटीचा दरोडा, सात दरोडेखोरांना ठोकल्या बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 12:11 IST2025-12-24T12:10:50+5:302025-12-24T12:11:06+5:30
प्रवासी म्हणून चढलेल्या तिघांनी ट्रॅव्हल्स चालकाला कोयत्याचा धाक दाखवून ट्रॅव्हल्सच्या डिकीतील ६० किलो चांदी, १० ग्रॅम सोने आणि मशीनचे स्पेअर पार्ट असा सुमारे सव्वा कोटीचा मुद्देमाल लंपास केला होता.

Kolhapur Crime: धावत्या ट्रॅव्हल्समध्ये सव्वा कोटीचा दरोडा, सात दरोडेखोरांना ठोकल्या बेड्या
कोल्हापूर/किणी : कोल्हापुरातून मुंबईला जाणाऱ्या अशोका ट्रॅव्हल्समध्ये प्रवासी म्हणून चढलेल्या तिघांनी ट्रॅव्हल्स चालकाला कोयत्याचा धाक दाखवून ट्रॅव्हल्सच्या डिकीतील ६० किलो चांदी, १० ग्रॅम सोने आणि मशीनचे स्पेअर पार्ट असा सुमारे सव्वा कोटीचा मुद्देमाल लंपास केला होता. पुणे-बंगळुरू महामार्गावर किणी (ता. हातकणंगले) गावाजवळ सोमवारी (दि. २२) रात्री अकराच्या सुमारास दरोड्याची घटना घडली.
पोलिसांनी १२ तासांत गुन्ह्याचा उलगडा करून सात दरोडेखोरांना अटक केली. त्यांच्याकडून दरोड्यातील सर्व मुद्देमाल हस्तगत केला. ट्रॅव्हल्समधील क्लिनरनेच टीप देऊन दरोडा घडवून आणल्याची माहिती पोलिस अधीक्षक योगेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अधीक्षक योगेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मच्छिंद्र नामदेव बोबडे (वय ४७, रा. भेंडे गल्ली, छत्रपती शिवाजी चौक, कोल्हापूर) हे दशरथ शामराव बोबडे यांच्या मालकीच्या न्यू अंगडिया सर्व्हिसचे पार्सल कोल्हापुरातून मुंबईला घेऊन जात होते. ६० किलो चांदी आणि १० ग्रॅम सोन्याची माळ या पार्सलची कच्ची पावती करून मुद्देमाल अशोका ट्रॅव्हल्सच्या डिकीत ठेवला होता.
कोल्हापुरातून निघालेल्या ट्रॅव्हल्समध्ये तावडे हॉटेल येथे तीन प्रवासी चढले. तिघांनीही तोंडावर रूमाल बांधले होते. वाठारजवळ गेल्यानंतर ते चालकाच्या केबिनमध्ये गेले. दोघांनी चालकाला कोयत्याचा धाक दाखवून किणी गावाच्या कमानीजवळ ट्रॅव्हल्स थांबवली. त्यानंतर दुचाकीवरून ट्रॅव्हल्सचा पाठलाग करीत आलेल्या तिघांसह ट्रॅव्हल्समधील तिघांनी डिकीतील चांदी, सोने आणि मशिनरीचे स्पेअरपार्ट घेऊन पोबारा केला.
ट्रॅव्हल्स थांबवली तर जिवे मारण्याची धमकी दरोडेखोरांनी चालकाला दिली होती. त्यामुळे घाबरलेला चालक ट्रॅव्हल्स घेऊन किणी टोल नाक्यापर्यंत गेला. तिथे थांबून त्यांनी पेठ वडगाव पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर काही वेळात दाखल झालेल्या पोलिसांनी घटनेची माहिती घेऊन तपास सुरू केला. दरम्यान, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने तावडे हॉटेल ते किणी टोल नाका येथील सीसीटीव्ही फुटेज तपासून दरोडेखोरांचा शोध सुरू केला. विक्रमनगर येथील अक्षय कदम याने गुन्हा केल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याच्या घरी जाऊन दरोड्यातील मुद्देमालासह त्याला अटक केली. टेंबलाई मंदिर येथून इतर सहा आरोपींना अटक केली.
यांना झाली अटक
ट्रॅव्हल्सचा क्लीनर सैफू बशीर अफगाणी (२३) त्याचा भाऊ जैद बशीर अफगाणी (२१, दोघे रा. मदिना कॉलनी, उचगाव), टोळीचा सूत्रधार अक्षय बाबासाहेब कदम (३१), अमन लियाकत सय्यद (२१, दोघे, रा. विक्रमनगर), अक्षयचा भाचा सुजल प्रताप चौगले (२०) आणि त्याचे साथीदार आदेश अरविंद कांबळे (१८) आणि आदिनाथ संतोष विपते (२५, तिघे रा. आकाशवाणी रोड, सांगली) यांना पोलिसांनी अटक केली. क्लीनर सैफू अफगाणी यानेच टीप देऊन दरोडा घडवून आणल्याची माहिती पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाली.