Kolhapur: आठवड्यापूर्वी कट रचून टाकला ट्रॅव्हल्समध्ये दरोडा; कर्जमुक्ती, चैनीसाठी विशीतील तरुणांचा प्रताप
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 12:18 IST2025-12-24T12:18:28+5:302025-12-24T12:18:42+5:30
अवैध पार्सल वाहतुकीचा मुद्दा ऐरणीवर

Kolhapur: आठवड्यापूर्वी कट रचून टाकला ट्रॅव्हल्समध्ये दरोडा; कर्जमुक्ती, चैनीसाठी विशीतील तरुणांचा प्रताप
उद्धव गोडसे
कोल्हापूर : ट्रॅव्हल्समध्ये क्लीनर म्हणून काम करणारा सैफू बशिर अफगाणी (वय २३, रा.विक्रमनगर, कोल्हापूर) याने कर्जातून मुक्त होण्यासाठी ट्रॅव्हल्समधील किमती वस्तूंच्या वाहतुकीची टीप भावाकरवी अक्षय कदम या मित्राला दिली. आठवड्यापूर्वीच त्यांनी एकत्र येऊन ट्रॅव्हल्समध्ये दरोडा घालण्याचा कट रचला. ठरल्यानुसार, त्यांनी दरोडा घालून ६० किलो चांदीसह १० ग्रॅम सोने लंपास केले. विशीतील तरुणांनी केलेला हा गंभीर प्रकार अवघ्या १२ तासांत पोलिसांनी उघडकीस आणला. मात्र, त्या निमित्ताने आचारसंहिता काळातही होत असलेल्या अवैध पार्सल वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
विक्रमनगर येथे राहणारा सैफू अफगाणी हा गेल्या तीन महिन्यांपासून एका ट्रॅव्हल्समध्ये क्लीनर म्हणून काम करीत आहे. त्याच्यावर साडेआठ लाखांचे कर्ज आहे. कर्जफेडीसाठी चोरीचा विचार त्याच्या मनात आला. या ट्रॅव्हल्समधून सोने, चांदी अशा किमती पार्सलची वाहतूक होत असल्याची माहिती त्याला मिळाली. याच मुद्देमालावर डल्ला मारण्याचा डाव त्याने आखला. त्याने याची माहिती भाऊ जैद अफगाणी (२१) याला दिली.
वाचा : धावत्या ट्रॅव्हल्समध्ये सव्वा कोटीचा दरोडा, सात दरोडेखोरांना ठोकल्या बेड्या
जैद याने विक्रमनगरातील मित्र अक्षय कदम (३१) याला पार्सल वाहतुकीची माहिती दिली. आठवड्यापूर्वी कदम याने त्याचा सांगलीतील भाचा सुजल चौगले (२०) याला बोलवून घेतले. चौघांनी कदमवाडीत एकत्र येऊन ट्रॅव्हल्समध्ये दरोडा घालण्याचा कट रचला आणि ठरल्यानुसार सोमवारी (दि. २२) रात्री अकराच्या सुमारास दरोडा घालून सव्वाकोटीचा मुद्देमाल लंपास केला.
या गुन्ह्यातील अक्षय कदम वगळता इतर सर्व आरोपी १८ ते २५ वयोगटांतील आहेत. यांच्यावर आधीचे काही गुन्हे दाखल नाहीत. ते मोलमजुरी आणि खासगी कंपनीत काम करतात. कर्जातून मुक्त होण्यासाठी आणि चैनीसाठी दरोडा घातल्याची कबुली त्यांनी पोलिसांकडे दिली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून गुन्ह्यातील मुद्देमालासह तीन दुचाकी, सात मोबाइल आणि दोन कोयते जप्त केले आहेत. त्यांच्यावर पेठवडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सुरू आहे.
मुद्देमालाची आयकरकडून चौकशी होणार
दरोडेखोरांकडून हस्तगत केलेल्या मुद्देमालाचा आयकर विभागाकडून चौकशी होणार आहे. जप्त चांदी कोणत्या सराफांकडून आली होती? त्याची बिले आहेत काय? पार्सलद्वारे पाठवल्या जाणाऱ्या चांदीचे प्रत्यक्ष वजन आणि बिलातील वजन योग्य आहे काय? याची चौकशी होणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक योगेश कुमार यांनी दिली.
आचारसंहितेतही राजरोस वाहतूक
आचारसंहिता सुरू असताना मोठी रोकड आणि किमती वस्तूंच्या वाहतुकीची पोलिसांना पूर्वकल्पना द्यावी लागते. सोबत पार्सल वाहतुकीचे पत्र ठेवावे लागते. मात्र, संबंधित ट्रॅव्हल्स कंपनीने सोने-चांदीच्या वाहतुकीची माहिती दिली नव्हती, असे पोलिस अधीक्षकांनी सांगितले.