चांदोलीमध्ये जैवविविधतेची श्रीमंती, जंगलात वन्यजीवांची निर्धास्त भ्रमंती
By संदीप आडनाईक | Updated: March 3, 2026 14:35 IST2026-03-03T14:34:58+5:302026-03-03T14:35:43+5:30
चांदोली धरणाच्या तलावात नावेतूनही जंगल फिरता येते.

चांदोलीमध्ये जैवविविधतेची श्रीमंती, जंगलात वन्यजीवांची निर्धास्त भ्रमंती
संदीप आडनाईक
कोल्हापूर : कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याचा समावेश असलेल्या चांदोली राष्ट्रीय उद्यान म्हणजे जैवविविधतेची श्रीमंती आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा भाग असलेल्या या अभयारण्यात लोकमतच्या टीमला वाघासह गरुड, गवे, सांबरे, महाराष्ट्राचा मानबिंदू शेखरू, हरियाल पक्षी, भेकर, रानडुक्कर, घुबड, सिव्हेट कॅट असे विविध वन्यजीव निर्धास्त भ्रमंती करताना आढळले.
सांगली जिल्ह्यातील वारणा नदीवरील चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांदोली अभयारण्य आहे. २००४ मध्ये याला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा मिळाला. चांदोली धरणाच्या तलावात नावेतूनही जंगल फिरता येते. ३१७.६७ किलोमीटर क्षेत्र असलेल्या या अभयारण्याला मार्च २००७ मध्ये राष्ट्रीय उद्यान म्हणून अधिकृत घोषित करण्यात आले आहे. चांदोली जलाशयाचा विस्तीर्ण आणि विहंगम परिसर दुर्गवाडीच्या डोंगरावरून दिसतो. वारणा नदीचा उगम येथेच होतो. १७ व्या शतकातील प्रचितगड, भैरवगड हे किल्ले ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे आहेत.
वाचा: थरारक... 'लोकमत'च्या कॅमेऱ्यात चंदाची भेदक नजर
चांदोली राष्ट्रीय उद्यानात ६ वाघांसह बिबट्या, अस्वले, अजगर, सरपटणारे विविध प्राणी, पक्षी, मोठ्या प्रमाणावर आहेत. राज्याचे मानबिंदू असणारे शेकरू तसेच हरियाल पक्षी यांचे अस्तित्वही येथे आहे. हे राज्यातले सर्वांत मोठे अभयारण्य आहे. सदाहरित हिरवे गर्द जंगल म्हणून हे राष्ट्रीय उद्यान पर्यटकांना आकर्षित करते. या संपूर्ण अभयारण्याची १२ खंडांत विभागणी केली आहे. वनविभागाने या क्षेत्राचे कोअर आणि बफर असे विभाग केलेले आहेत. प्राण्यांचे पाणवठे, पायवाटांवरील पायांचे ठसे, झाडांवरील ओरखडे, विष्ठा यांची तपासणी हे येथील कर्मचाऱ्यांचे नियमित काम आहे.