Kolhapur: 'शेअर'मधील नफ्याच्या आमिषाने निवृत्त अधिकाऱ्याची ३३ लाखांची फसवणूक, गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 19:10 IST2025-11-12T19:08:30+5:302025-11-12T19:10:15+5:30
निवृत्तीचे पैसे आमिषाने गुंतविले अन् फसले...

Kolhapur: 'शेअर'मधील नफ्याच्या आमिषाने निवृत्त अधिकाऱ्याची ३३ लाखांची फसवणूक, गुन्हा दाखल
कोल्हापूर : शेअर ट्रेडिंगमध्ये जादा नफ्याचे आमिष दाखवून बनावट ॲपद्वारे शासनाच्या पशुसंर्वधन विभागाचे निवृत्त अधिकारी विजयानंद रत्नाकर पाटील (वय ५९, रा. नलवडे प्लॉट, प्रतिभानगर, कोल्हापूर) यांची ३३ लाख ४५ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. दि. १ मे ते दि. ८ जून २०२५ अखेर व्हॉटसॲपवर लिंकवरील चॅटिंगद्वारे पाच मोबाइल क्रमांकाद्वारे श्रीकृष्णरथ असे नाव सांगणाऱ्याने त्यांची फसवणूक केली.
पोलिस फिर्यादीत म्हटले आहे, की पाटील हे वर्षापूर्वीच निवृत्त झाले आहेत. शेअर मार्केटिंगमध्ये पैसे गुंतवणुकीसंबंधी मोबाइलवर माहिती घेताना गुगल प्ले स्टोअरमध्ये काही ॲप असल्याचे त्यांना समजले. दरम्यान, पाटील यांच्या मोबाइल क्रमांकावरील व्हॉटसॲपवर ९३४१८१००५१, ८९६२९८३७९२, ९६८५३५९१४१, ६२९९६३३२६९, ७४८८७१७३८४ या मोबाइल क्रमांकावरून मेसेज येत होते. पाटील यांना ‘ अबाउट वेल्थ मॅनेजमेंट कम्युनिटी’ असे इंग्रजीत लि. कोलकत्ता या कंपनीचे सेबीने स्टॉक ब्रोकर म्हणून नोंदणीकृत प्रमाणपत्र पाठविले. ७४८८७१७३८४ या व्हॉटसॲपवर श्रीकृष्णरथ नावच्या व्यक्तीने पहिल्यांदा पाटील यांना व्हिडिओ कॉल करून पडताळणी करून खात्री करून घेतली.
व्हॉट्सॲपवर लिंक पाठवून पाटील यांना अबाउट वेल्थ मॅनेजमेंट या नावाचे शेअर्स ट्रेडिंगचे बनावट ॲप सुरू करण्यास भाग पाडले. व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सहभागी करून घेऊन पाटील यांना शेअर्स ट्रेडिंगमध्ये जास्त नफा असल्याचे सांगत विश्वास मिळवला. बँक खाते क्रमांक देऊन पैसे गुंतवण्यास सांगितले. पाटील यांनी मे महिन्यात पहिल्यांदा एक लाख रुपये गुंतवले. यावर ॲपवर त्यांना १५ हजार रुपये जादा दिसू लागले. मात्र काढण्याचा प्रयत्न केल्यानंतर ते निघत नव्हते. हे पैसे काढायचे असतील तर पुन्हा पैसे भरावे लागतील. असे सांगत पाटील यांना ८ जून २०२५ पर्यंत सुमारे ३० लाख रुपये पाठवले.
तीस लाख रुपये हवे असतील तर पुन्हा ३ लाख ४५ हजार रुपये भरा, असे सांगण्यात आले. अशाप्रकारे पाटील यांची ३३ लाख ४५ हजार रुपयांची फसवणूक झाली आहे. ग्रुप आणि मोबाइल नंबरही गायब झाल्यानंतर पाटील यांना फसगत झाल्याचे कळाले. मग त्यांनी राजारामपुरी पोलिसात फिर्याद दिली.
निवृत्तीचे पैसे आमिषाने गुंतविले अन् फसले...
पाटील हे निवृत्त झाल्यामुळे त्यांना विविध प्रकारचे फंड मिळाले होते. त्यांच्या खात्यावर ३० लाखांहून अधिक रक्कम होती. शेअर ट्रेडिंगमध्ये नफ्याच्या आमिषांना त्यांना गुंतवणूक करण्यास भाग पाडले आणि त्यांची फसवणूक झाली.