Kolhapur: निवृत्त नायब तहसीलदारास लाच घेताना अटक, रेंदाळमधील जमिनीचा मोबदला देण्यासाठी घेतले पैसे
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 12:30 IST2025-11-13T12:29:07+5:302025-11-13T12:30:32+5:30
चांगली माहिती आहे म्हणून रीतसर पेन्शन असूनही ३० हजार मासिक मानधनावर पुन्हा सेवेत रुजू करून घेण्यात आले होते.

Kolhapur: निवृत्त नायब तहसीलदारास लाच घेताना अटक, रेंदाळमधील जमिनीचा मोबदला देण्यासाठी घेतले पैसे
कोल्हापूर : दूधगंगा कालव्यासाठी भूसंपादित केलेल्या जमिनीचा मोबदला मिळवून देण्याचे वरिष्ठांकडून काम करून घेण्यासाठी रेंदाळ (ता.हातकणंगले) येथील शेतकऱ्याकडून ८ हजारांची लाच घेताना भूसंपादन कार्यालयातील (क्रमांक ६) मानधनावरील कर्मचारी असलेल्या निवृत्त नायब तहसीलदारास बुधवारी रंगेहाथ पकडण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळच उद्योग भवनासमोर ही कारवाई करण्यात आली. ईलाही मीरा मुल्ला (वय ७१, रा. २५१९, ‘डी’ वॉर्ड, डांगे गल्ली, जुना बुधवार पेठ, कोल्हापूर) असे त्याचे नाव आहे.
घडले ते असे : तक्रारदार शेतकऱ्याची गट नंबर ९८७ मध्ये सामायिक शेती आहे. त्यातील ६० गुंठे क्षेत्र कालव्यासाठी भूसंपादित केले आहे. त्याचा मोबदला मिळवण्यासाठी तक्रारदारांच्या वडील, काका व आत्या यांच्या नावे नोटीस निघाली होती; परंतु तक्रारदार यांच्या वडिलांचे निधन झाल्याने तो मोबदला मिळण्यासाठी त्यांनी ४ सप्टेंबर २०२५ ला भूसंपादनच्या उपजिल्हाधिकारी अर्चना नष्टे यांच्याकडे त्यांनी अर्ज केला होता.
त्या अर्जाचे काय झाले, याची चौकशी करण्यासाठी तक्रारदार ३ नोव्हेंबर २०२५ ला नष्टे यांच्या कार्यालयात गेले होते. तेव्हा मुल्ला त्यांना भेटला व हे काम करून देण्यासाठी दहा हजारांची लाच मागितली. म्हणून तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंध कार्यालयाकडे तक्रार केली. त्यानुसार बुधवारी उद्योगभवनजवळ सापळा लावण्यात आला आणि मुल्ला लाच घेताना सापडला.
ही कारवाई पोलिस उपअधीक्षक वैष्णवी पाटील, सहायक फौजदार प्रकाश भंडारे, हवालदार विकास माने, संदीप काशीद, संगीता गावडे, सचिन पाटील, उदयसिंह पाटील, गजानन कुराडे यांच्या पथकाने केली.
फायलीवर सही होताच..
संबंधित तक्रारदार यांच्या मोबदल्याचे प्रकरण २०१६ पासून सुरू आहे. त्यासाठी ते वारंवार हेलपाटे मारत होते; परंतु गेल्या आठवड्यात ते येऊन पैसे देतो, असे सांगून गेले. नेमके योगायोगाने त्यांचा मोबदला मंजूर करण्याच्या फायलीवर उपजिल्हाधिकारी अर्चना नष्टे यांनी दुपारी १ वाजता सही केली. ती फाइल घेऊनच मुल्ला खाली आले. टेबलवर फाइल ठेवून ५ मिनिटांत येतो, असे सांगून बाहेर पडले आणि तिथेच त्यांना अटक झाली.
चांगली माहिती म्हणून..
मुल्ला हे गेली अनेक वर्षे त्याच कार्यालयात सेवेत आहेत. नियमित सेवेतून २०१८ मध्ये निवृत्त झाल्यानंतर त्यांना या विभागातील चांगली माहिती आहे म्हणून रीतसर पेन्शन असूनही ३० हजार मासिक मानधनावर पुन्हा सेवेत रुजू करून घेण्यात आले होते.
तीन फायली नेल्या
अटकेची कारवाई होताच उपअधीक्षक वैष्णवी पाटील या तातडीने मुल्ला काम करत असलेल्या कार्यालयात आल्या व त्याच्या टेबलवरील या प्रकरणाशी संबंधित तीन फायली घेऊन गेल्या. लाच कारवाई झाल्याची माहिती त्यांनी नष्टे यांना दिली.