‘गोकुळ’ची बदनामी करणाऱ्यांना जशास तसे उत्तर

By Admin | Updated: September 4, 2016 01:28 IST2016-09-04T00:51:12+5:302016-09-04T01:28:31+5:30

सत्तारूढ गटाचा इशारा : पोलिसांनी गांभीर्याने लक्ष द्यावे - सतेज पाटील

Responding to the defamers of 'Gokul' | ‘गोकुळ’ची बदनामी करणाऱ्यांना जशास तसे उत्तर

‘गोकुळ’ची बदनामी करणाऱ्यांना जशास तसे उत्तर

कोल्हापूर : ‘गोकुळ’ने आपल्या गुणवत्तेच्या बळावर देशपातळीवर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे; पण राजकीय द्वेषातून संघाची बदनामी सुरू आहे. आगामी सर्वसाधारण सभेत अशा प्रवृत्तीला जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा सत्तारूढ गट समर्थकांच्या बैठकीत देण्यात आला.
संघाच्या बुधवारी (दि. ७) होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सत्तारूढ व विरोधकांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. सत्तारूढ गटाच्या समर्थकांची शनिवारी ताराबाई पार्क येथे बैठक झाली. त्यामध्ये विरोधकांचे आव्हान रोखण्याची रणनीती ठरविण्यात आली. गेले आठ-दहा दिवस तालुका संपर्कसभा घेऊन सर्वसाधारण सभेतील तणाव कमी करण्याचा संचालकांनी प्रयत्न केला आहे. सत्तारूढ गटाच्या समर्थकांची बैठक घेऊन विरोधकांना कसे रोखता येईल, याची व्यूहरचना ठरविण्यात आली. विरोधक कोणत्या मुद्द्यांवर कोंडीत पकडणार, त्याला उत्तर कसे द्यायचे, याची चर्चा झाली. विरोधकांकडून संघाची बदनामी सुरू असून, वासाचे दूध स्वीकारले तर गुणवत्तेबाबत बाजारपेठेत चुकीचा संदेश जाईल; त्यामुळे संघाची बदनामी करणाऱ्यांना जशाच तसे उत्तर देण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. बैठकीला आमदार सत्यजित पाटील-सरुडकर, माजी महापौर सुनील कदम, सत्यजित कदम, यांच्यासह सत्तारूढ गटाचे समर्थक उपस्थित होते.
दरम्यान, आमदार सतेज पाटील यांनी सभेच्या कामकाजाबाबत विभागीय उपनिबंधकांबरोबरच पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केली आहे. सभासद नसणाऱ्या व्यक्तींना उपस्थित ठेवून व्यत्यय, तसेच गोंधळ निर्माण करण्याचा व प्रश्नच विचारू न देण्याचा प्रयत्न सत्तारूढ गटाकडून होऊ शकतो. लोकशाही पद्धतीने सभा होण्यासाठी पोलिस प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी त्यांनी पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांच्याकडे केली आहे.

Web Title: Responding to the defamers of 'Gokul'