अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरण: निकालावर अहवाल द्या, अपील दाखल करा; राजू गोरेंची मुंबई पोलिस आयुक्तांकडे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 15:30 IST2025-05-20T15:30:22+5:302025-05-20T15:30:58+5:30
तपास अधिकाऱ्याला त्रास

अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरण: निकालावर अहवाल द्या, अपील दाखल करा; राजू गोरेंची मुंबई पोलिस आयुक्तांकडे मागणी
कोल्हापूर : अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणात विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांच्याकडून झालेल्या निकालावरती तत्काळ अहवाल घ्यावा. उच्च न्यायालयात तत्काळ अपील दाखल करावे, यांसह अन्य मागण्यांचे निवेदन आश्विनी बिद्रे यांचे पती राजू गोरे यांनी नवी मुंबईच्या पोलिस आयुक्तांना रजिस्टरने सोमवारी पाठविले आहे.
त्यांनी पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, सहायक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांची हत्या झाली. झाल्यापासून सहायक पोलिस निरीक्षक आश्विनी बिद्रे यांची हत्या झाल्यापासून कुटुंबीय न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. निकाल होऊन, शिक्षा होऊन सुमारे एक महिना झाला. मात्र पोलिस आयुक्त कार्यालयाकडून काही मुद्द्यावर पुढील कार्यवाही झालेली नाही. ती तत्काळ करण्यात यावी. उच्च न्यायालयात तत्काळ अपील दाखल केल्यास आरोपींना कठोर शिक्षा होईल.आरोपींना मदत करणाऱ्या तपास अधिकाऱ्यांवर तत्काळ फौजदार संहितेखाली कारवाई करावी.
सहायक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांची हत्या झाल्यापासून निवृत्तीपर्यंतचा पगार द्यावा. न्यायालयाने निकालपत्रात आणि निकाल देताना माजी पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांचा पुनश्च जबाब नोंदवून कारवाई करावे, असे म्हटले आहे. त्यानुसार नगराळे याच्यावर कारवाई करावी. आश्विनी यांचा मृत्यू दाखला मिळवून देण्यासाठी मदत करावी.
उच्च न्यायालयात खटला लढण्यासाठी विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांची नियुक्ती कायम रहावी. बिद्रे यांच्या मृत्यूनंतर मिळणाऱ्या सर्व सवलती अद्याप मिळालेल्या नाहीत. त्या वारसा म्हणून तत्काळ मिळण्यासाठी संबंधितांना आदेश द्यावेत. आरोपींच्या बाबतीत जी अपिले होती, त्याची माहिती किमान चार दिवस आधी आम्हाला कळवावी, यासह अन्य मागण्या केल्या आहेत.
तपास अधिकाऱ्याला त्रास
सहायक पोलिस आयुक्त संगीता शिंदे-अल्फान्सो यांच्या कुशल तपासामुळे बिद्रे यांना न्याय मिळाला. मात्र या महिला पोलिस अधिकाऱ्याला कसा त्रास होईल, त्यासाठी एक यंत्रणा कार्यरत आहे, ही बाब निंदनीय आहे, असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.