कोल्हापूर-पुणे नव्या रेल्वेमार्गाबाबत १५ दिवसांत अहवाल द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:25 IST2021-01-20T04:25:57+5:302021-01-20T04:25:57+5:30

कोल्हापूर : कोल्हापूर-पुणे नवीन प्रस्तावित अतिजलद रेल्वेमार्गासंदर्भात येत्या १५ दिवसांत प्राथमिक अहवाल सादर करावा, असे निर्देश परिवहन राज्यमंत्री सतेज ...

Report on Kolhapur-Pune new railway line within 15 days | कोल्हापूर-पुणे नव्या रेल्वेमार्गाबाबत १५ दिवसांत अहवाल द्या

कोल्हापूर-पुणे नव्या रेल्वेमार्गाबाबत १५ दिवसांत अहवाल द्या

कोल्हापूर : कोल्हापूर-पुणे नवीन प्रस्तावित अतिजलद रेल्वेमार्गासंदर्भात येत्या १५ दिवसांत प्राथमिक अहवाल सादर करावा, असे निर्देश परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील यांनी ‘महारेल’च्या अधिकाऱ्यांना दिले. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी मंत्रालयात याबाबत बैठक आयोजित झाली.

महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव नितीन करीर, ‘महारेल’चे व्यवस्थापकीय संचालक राजेश कुमार जयस्वाल, वित्त विभागाचे सहसचिव विवेक दहिफळे, वनविभागाचे सहसचिव श्री. गावडे, परिवहन विभागाचे उपसचिव प्रकाश साबळे व ‘महारेल’चे अतिरिक्त महाव्यवस्थापक प्रशांत मयेकर, कोल्हापूर विभागीय रेल्वे प्रवासी सल्लागार समितीचे सदस्य आनंद माने उपस्थित होते. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई आणि पुणे, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांचे प्रतिनिधी दूरदृश्य प्रणालीद्वारे या बैठकीत सहभागी झाले होते.

मंत्री पाटील म्हणाले, कोल्हापूर, सातारा, कऱ्हाड या भागांतून रोज सुमारे २५ लाख लिटर दूध पुणे व मुंबई शहरांना पुरविण्यात येते. कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांतून रोज २०० हून अधिक ट्रक भाजीपाला पुण्या-मुंबईसाठी रवाना होतो. कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांत अनेक साखर कारखाने असून मोठ्या प्रमाणात ऊस उत्पादित होतो. पुणे-कोल्हापूर नवीन रेल्वेमार्ग झाल्यास मालाचा वाहतुकीचा खर्चही वाचणार असून अडचणीत असणाऱ्या साखर कारखान्यांना त्याचा उपयोग होईल. कोल्हापूर, सातारा जिल्हा व परिसरांतील आयटी क्षेत्रामधील सुमारे १० हजार कर्मचारी पुणे-मुंबई येथे कामानिमित्त प्रवास करतात. कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांचे औद्योगिकदृष्ट्या महत्त्व लक्षात घेता पुणे ते कोल्हापूर हा सरळ नवीन अतिजलद रेल्वेमार्ग झाल्यास कोल्हापूर, सातारा व कऱ्हाड या परिसरातील उद्योगांना चालना मिळणार आहे.

चौकट

वेळ आणि खर्चात बचत

रेल्वेमार्गाने पुण्याहून कोल्हापूरला जाण्यासाठी सात तास लागतात आणि ते अंतर ३४० किलोमीटर इतके आहे. सध्याचा रेल्वेमार्ग सरळ नसून वळणावळणाचा आहे. त्यामुळे प्रवासास विलंब होतो. पुण्याहून कोल्हापूरला रस्त्याने गेल्यास साडेचार तास लागतात आणि ते अंतर २३० किलोमीटर आहे. या नव्या मार्गामुळे नागरिकांच्या वेळ आणि खर्चात बचत होऊ शकेल असे मंत्री पाटील यांनी पटवून दिले.

चौकट

वैभववाडी अजून प्रस्तावितच

कोल्हापूर-वैभववाडी प्रस्तावित रेल्वेमार्गासंदर्भातही या बैठकीत चर्चा झाली. या प्रकल्पाची लांबी १०७ किलोमीटर आहे. या प्रकल्पास रेल्वे मंत्रालयाची मान्यता असून त्याचा समावेश २०११-१२ च्या रेल्वे अर्थसंकल्पात करण्यात आला. कोकण रेल्वे मंडळाने या प्रकल्पाचे सर्वेक्षण करून प्रकल्प अहवालही सादर केला; पण पुढे काहीच झालेले नाही.

१९०१२०२० कोल सतेज पाटील

कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी कोल्हापूर-पुणे प्रस्तावित अतिजलद रेल्वेमार्गाबाबत मंगळवारी मंत्रालयात बैठक घेतली. यावेळी ‘महारेल’सह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Report on Kolhapur-Pune new railway line within 15 days