बनावट नोटातील आरोपींच्या नातेवाइकांचीही चौकशी, कोल्हापुरातील बडतर्फ पोलिसाचे व्यावसायिक भागीदार रडारवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 15:10 IST2025-10-14T15:09:27+5:302025-10-14T15:10:00+5:30
बँक खात्यांची तपासणी सुरू

बनावट नोटातील आरोपींच्या नातेवाइकांचीही चौकशी, कोल्हापुरातील बडतर्फ पोलिसाचे व्यावसायिक भागीदार रडारवर
कोल्हापूर : सुमारे एक कोटीच्या बनावट नोटा छापून त्या खपविण्याच्या प्रयत्नातील टोळीच्या नातेवाइकांचीही चौकशी मिरज पोलिसांकडून केली जात आहे. त्यांची बँक खाती आणि गेल्या वर्षभरातील मालमत्ता खरेदीची माहिती घेतली जात आहे. गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार बडतर्फ पोलिस हवालदार इब्रार आदम इनामदार याच्या व्यावसायिक भागीदारांचाही गैरकृत्यांमध्ये सहभाग असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे त्यांचीही चौकशी होण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविली जात आहे.
सिद्धलक्ष्मी अमृततुल्य चहा या नावाने चहाच्या व्यवसायाची फ्रँचायझी देणारा बडतर्फ पोलिस हवालदार इब्रार इनामदार याने सिद्धलक्ष्मीच्या कार्यालयात कोट्यवधी रुपयांच्या बनावट नोटा छापल्याचे उघडकीस आले आहे. मिरज पोलिसांनी या रॅकेटचा पर्दाफाश केल्यानंतर तपासात याची व्याप्ती वाढत असल्याचे दिसत आहे. नोटांची छपाई करणाऱ्या तिघांसह त्या विविध ठिकाणी खपविणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. यातून बनावट नोटांचे कोल्हापूर आणि मुंबई कनेक्शन समोर आले आहे.
वाचा : एक कोटीच्या बनावट नोटा प्रकरणाची एनआयएकडून दखल, सूत्रधार इब्रारच्या पोलिस कोठडीत वाढ
अटकेतील आरोपींनी बनावट नोटांमधून मोठी कमाई केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. यासाठी त्यांच्या बँक खात्यासह नातेवाइकांचीही चौकशी केली जात आहे. नातेवाइकांची बँक खाती, गेल्या वर्षभरात त्यांनी केलेली जंगम आणि स्थावर मालमत्तेची माहिती घेतली जात आहे. काही नातेवाइकांचे जबाब नोंदविले जाणार आहेत, अशी माहिती मिरज पोलिसांनी दिली.
व्यावसायिक भागीदारांचाही सहभाग?
इनामदार याच्या सिद्धलक्ष्मी चहाच्या व्यवसायात एका बांधकाम व्यावसायिकाची भागीदारी असल्याची माहिती मिळत आहे. बनावट नोटांच्या छपाईची त्याला कल्पना असावी किंवा त्याचाही यात सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे इनामदारच्या भागीदारांचीही चौकशी करणार असल्याची माहिती मिरज पोलिसांनी दिली.
इतर कारनामेही उघडकीस येण्याची शक्यता
बनावट नोटांच्या गुन्ह्यात अटकेत असलेला इनामदार याच्यावर दमदाटीचा गुन्हा दाखल आहे. राहुल जाधव हा गांजा विक्री आणि फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपी आहे. इतर आरोपीही गुन्हेगारी प्रवृत्तीचे असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अधिक तपासात त्यांचे आणखी काही कारनामे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.