कोल्हापुरात आज रेड अलर्ट; गगनबावडा, कागलमध्ये अतिवृष्टी, १३ बंधारे पाण्याखाली
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 12:11 IST2025-05-27T12:10:49+5:302025-05-27T12:11:37+5:30
जिल्हा प्रशासनाचे सतर्कतेचा इशारा

संग्रहित छाया
कोल्हापूर : जिल्ह्यात सोमवारी पावसाने दिवसभर उघडीप दिली असली तरी रात्री जोरदार कोसळत आहे. गगनबावडा, कागल तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. नद्यांच्या पातळीत वाढ होत असून, १३ बंधारे पाण्याखाली गेल्याने पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू केली आहे. पुढील २४ तासांत जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यात ‘रेड अलर्ट’ जाहीर करण्यात आल्याने जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
भारतीय हवामान खात्याने सोमवारी सायंकाळी पाचनंतर २४ तासांत कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस होईल, तरी नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. सोमवारी दिवसभर पावसाने उघडीप दिली. गेले आठ दिवस जिल्ह्यात पावसाने ठिय्या मांडला आहे. यामुळे जनजीवन काहीसे विस्कळीत झाले आहे. त्याचा सर्वाधिक फटका शेतीला बसला आहे. उन्हाळी भुईमूग, भात, सूर्यफूल खराब होत असल्याने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.
ऐन उन्हाळ्यात नद्यांचे पाणी पात्राबाहेर फेकले गेल्याने नदीकाठावरील कमी उंचीची पिके अडचणीत आली आहेत. गगनबावडा, कागल, शाहूवाडी, राधानगरी, करवीर, आजरा, गडहिंग्लज तालुक्यात जोरदार पाऊस झाला आहे. पंचगंगा नदीची पातळी दिवसभरात अर्धा फुटांनी वाढली असून रात्री सात वाजता १९ फुटांपर्यंत पोहोचली आहे.
शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे
सोमवारी सकाळी आकाश मोकळे दिसत होते, त्यामुळे पाऊस उसंत घेईल असे वाटत होते. पाऊस थांबणार कधी? मशागत करून खरिपाची पेरणी कधी करायची? या चिंतेत शेतकरी आहे. त्यामुळे रोज उठले की त्याच्या नजरा आकाशाकडे लागलेल्या असतात.
तालुकानिहाय पाऊस मिलीमीटरमध्ये असा-
- हातकणंगले - ३३.२
- शिरोळ -२६.१
- पन्हाळा - ३१.९
- शाहूवाडी - ५०.०
- राधानगरी - ४८.२
- गगनबावडा - १०२.४
- करवीर - ४५.४
- कागल -६५.०
- आजरा - ५१.५
- भुदरगड - ४४.४
- चंदगड - ३५.३
- गडहिंग्लज - ५०.२