कोल्हापूर : कोल्हापूरला गुरुवारी दुपारी १ ते ४ या वेळेत पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला होता. परंतु, या तीन तासांत नव्हे, तर दिवसभरात पाऊसच आला नाही. गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत जिल्ह्यातील पावसाचा जोर ओसरला आहे. गुरुवारी सकाळी १० वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी फक्त १०.८ मिलिमीटर पाऊस झाला असून सर्वाधिक पाऊस गगनबावडा तालुक्यात झाला आहे. परंतु, पंचगंगेच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.बुधवारी दुपारनंतर थांबून थांबून का असेना पावसाच्या सरी सुरू होत्या. त्यामुळे पाऊस बरसेल, असे वाटत होते. कोल्हापूर पाटबंधारे उत्तर विभागातील सात धरणे १०० टक्के भरली असून, १७ पैकी १६ प्रक्लपांतून विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यातही शाहूवाडी, राधानगरी तालुक्यांत पावसाचा जाेर दिसून आला; परंतु इतर तालुक्यांमध्ये तुलनेत पावसाचे प्रमाण कमी आहे. राधानगरी तालुक्यातील राधानगरी धरण ९६ टक्के, तुळशी ७९ टक्के तर दूधगंगा धरण ७० टक्के भरले आहे.पावसाचा जोर ओसरला असला तरी धरणक्षेत्रातील पाऊस आणि धरणातील विसर्ग यामुळे कोल्हापूरजवळच्या राजाराम बंधाऱ्याजवळ पंचगंगा नदीची सकाळी १० वाजता असलेली १८ फूट ३ इंचावरील पाणीपातळी संध्याकाळी सहा वाजता २० फूट १ इंचापर्यंत वाढली आहे. गेल्या दीड महिन्यात दोनवेळा ही पाणीपातळी ३२ फुटांपर्यंत गेली होती. परंतु, नंतर परत पाऊस कमी झाल्याने ती झपाट्याने खाली आली. सध्या जिल्ह्यातील नऊ बंधारे पाण्याखाली आहेत.
कोल्हापूरला रेड अलर्ट, पण पाऊस आलाच नाही; पंचगंगेच्या पाणीपातळीत वाढ
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 12:09 IST