शेतकऱ्याच्या पोराची गरुडभरारी, कोल्हापुरातील पन्हाळ्याच्या रणजितची इस्त्रोमध्ये झाली निवड
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2023 13:04 IST2023-04-03T13:04:00+5:302023-04-03T13:04:32+5:30
तब्बल दहा हजार विद्यार्थ्यांमधून झाली निवड. इडब्ल्यूएस प्रवर्गातून पाचवी रँक मिळाली

शेतकऱ्याच्या पोराची गरुडभरारी, कोल्हापुरातील पन्हाळ्याच्या रणजितची इस्त्रोमध्ये झाली निवड
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील खोतवाडी गावातून रणजित खोत याने बंगळुरू येथील भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (इस्रो)च्या यू.आर. राव सॅटेलाइट सेंटरपर्यंत भरारी घेतली आहे. तब्बल दहा हजार विद्यार्थ्यांमधून निवड झालेला रणजित शेतकरी कुटुंबातील आहे.
पन्हाळा तालुक्यातील खोतवाडी येथील आनंदा खोत या शेतकऱ्याचा मुलगा रणजितने २०२२ मध्ये इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (इस्रो) मार्फत घेण्यात आलेल्या टेक्निशियन बी या पदासाठी परीक्षा दिली होती. या परीक्षेत रणजितला इडब्ल्यूएस प्रवर्गातून पाचवी रँक मिळाली आहे. त्याची बंगळुरू येथील यू.आर. राव सॅटेलाइट सेंटरमध्ये टेक्निशियन म्हणून नियुक्ती झाली आहे. या पदांसाठी रणजितने जानेवारीत ऑनलाइन अर्ज केला होता. निवडलेल्या उमेदवारांची मुलाखत २२ ऑक्टोबर रोजी झाली.
रणजितचे आईवडील खोतवाडीत शेती करतात. त्याचा एक भाऊ कोल्हापुरात खासगी कंपनीत नोकरी करतो. त्याने कोल्हापुरात आयटीआयमध्ये शिक्षण घेतले. काही काळ तेथे नोकरी केल्यानंतर त्याने कोल्हापुरातील शासकीय तंत्रनिकेतनमधून इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेलिकम्युनिकेशनची पदविका घेतली. त्याने आजरा येथील आयटीआयमध्ये २०१७ पासून नोकरी केली होती.