अश्विनी बिद्रे-गोरे खुनातील कैद्यावर पॅरोलची खैरात, राजू गोरे यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 15:53 IST2025-11-21T15:53:04+5:302025-11-21T15:53:51+5:30
जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला कैदी बडतर्फ पोलिस निरीक्षक अभय शामसुंदर कुरुंदकर याने सहा महिन्यांत दुसऱ्यांदा केलेल्या पॅरोल रजा अर्जावर फिर्यादी राजू गोरे यांनी हरकत घेतली

अश्विनी बिद्रे-गोरे खुनातील कैद्यावर पॅरोलची खैरात, राजू गोरे यांचा आरोप
कोल्हापूर : सहायक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे-गोरे यांचे अपहरण आणि खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला कैदी बडतर्फ पोलिस निरीक्षक अभय शामसुंदर कुरुंदकर याने सहा महिन्यांत दुसऱ्यांदा केलेल्या पॅरोल रजा अर्जावर फिर्यादी राजू गोरे यांनी हरकत घेतली आहे. कुरुंदकर याच्यावर पॅरोलची खैरात का सुरू आहे? पोलिस यंत्रणा त्याला मदत करीत आहे काय? असा सवाल गोरे यांनी उपस्थित केला आहे.
अश्विनि बिद्रे यांच्या खुनाचा प्रमुख सूत्रधार अभय कुरुंदकर हा सध्या छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. शिक्षा जाहीर झाल्यानंतर पहिल्या महिन्यातच त्याला पॅरोल रजा मंजूर झाली होती. त्यावर बिद्रे-गोरे कुटुंबीयांनी आक्षेप घेतला होता. आता सहा महिन्यांच्या आत दुसऱ्यांदा त्याने पॅरोल रजेसाठी अर्ज केला असून, कारागृह प्रशासनाने राजारामपुरी पोलिसांना पत्र पाठवले आहे.
याबाबत फिर्यादी गोरे यांचे मत नोंदवून अहवाल मागविला आहे. यासाठी राजारामपुरी पोलिसांनी बुधवारी रात्री राजू गोरे यांना फोन करून तातडीने मत नोंदवण्यास सांगितले. मात्र, गोरे यांनी यावर आक्षेप घेऊन संबंधित पत्र हातकणंगले पोलिस ठाण्यात वर्ग करण्यास सांगितले. त्यानंतर हातकणंगले पोलिसांनी गोरे यांना गुरुवारी मत नोंदवण्यासाठी बोलविले होते.
जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या कैद्याला पॅरोल मंजूर व्हावा यासाठी पोलिसांची एवढी तत्परता कशासाठी? असा प्रश्न गोरे यांनी उपस्थित केला आहे. याबाबत यापूर्वीही त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथील कारागृह विशेष पोलिस महानिरीक्षकांना पत्र पाठवून नाराजी व्यक्त केली होती. आता पुन्हा कैदी कुरुंदकर याच्यावर पॅरोलची खैरात सुरू असल्याबद्दल नाराजी व्यक्त करीत पॅरोलवर हरकत घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.