धमेंद्र गेले..कोल्हापुरातील कोल्ड्रिंक्स विक्रेते राजू मनगुळेंच्या अश्रूंचा बांध फुटला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 18:23 IST2025-11-25T18:22:51+5:302025-11-25T18:23:16+5:30
घरात धर्मेंद्र यांच्या १८० हून अधिक चित्रपट आणि सीडीजचा संग्रह

धमेंद्र गेले..कोल्हापुरातील कोल्ड्रिंक्स विक्रेते राजू मनगुळेंच्या अश्रूंचा बांध फुटला...
कोल्हापूर : वयाच्या दहाव्या वर्षी बॉलिवूडचे ही मॅन धर्मेंद्र यांचा ‘माँ’ चित्रपट बघितला..त्यांचा मोठा चाहता झालो. या अभिनेत्याची चित्रपटातील छबी बघण्यासाठी रात्रंदिवस थिएटरबाहेर घुटमळत होतो, धर्मेंद्र यांचा प्रत्येक चित्रपट पहिल्या दिवशी बघण्याचं फॅड डोक्यात बसलं आणि आज वयाच्या ५९ व्या वर्षीदेखील ते कायम आहे. आज धरमजी गेल्याची बातमी आली आणि काळजाचा ठोकाच चुकला, वडील गेल्याचे दु:ख झाले. माझ्यासारख्या कोल्हापूर बसस्थानकाच्या बाहेर सरबत विकणाऱ्या चाहत्याला दोनवेळा त्यांना भेटता आलं, माणूस म्हणून मला जगायला शिकवणारा अभिनेता गेल्यानं पोरका झाल्याची भावना सरबत विक्रेते राजू ऊर्फ इकबाल मनगुळे यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला.
कदमवाडीत राहणारे राजू ऊर्फ इकबाल मनगुळे यांचा कोल्हापुरातील मध्यवर्ती बसस्थानकाशेजारी १९८४ पासून कोल्ड्रिंक्सचा गाडा आहे. त्याचे नावही धरम कोड्रिंक्स आहे. अभिनेत्यावरील जीवापाड प्रेम करणाऱ्या या चाहत्याला कोल्हापुरातही 'धरम सरबतवाले' म्हणूनच ओळख मिळाली. धर्मेंद्र यांना भेटण्याची राजू यांची तीव्र इच्छा होती मात्र ते शक्य होत नव्हते म्हणून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने रेल्वेने ते सलग सहावेळा मुंबईला गेले, मात्र धर्मेंद्र यांची भेट झाली नाही पण २०१२ साली मात्र त्यांच्या कर्मचाऱ्यांनी राजू मरगळे यांचा नंबर घेऊन भेटण्याची वेळ निश्चित केली.
धर्मेंद्र घरातून बाहेर पडत असताना त्यांनी राजू यांची आस्थेने विचारपूस केली. जेवला का, असे विचारत त्यांनी खिशातून पाचशेच्या दोन नोटा काढून देण्याचा प्रयत्न केला मात्र राजू यांनी 'तुम्ही भेटला मला सर्व काही मिळालं' असं सांगत पैसे स्वीकारण्यास नकार दिला.
चित्रपटांचा संग्रह...
कामानिमित्त अभिनेते धर्मेंद्र हेमामालिनीसोबत छोटी इशा देओल यांना घेऊन कोल्हापुरात आले होते तेव्हाही भेट झाल्याचे राजू मनगुळे यांनी सांगितले. राजू यांच्या पत्नी महानंदा यांनाही धर्मेंद्र यांचे चित्रपट आवडतात, टीव्ही आणि घरात धर्मेंद्र यांच्या १८० हून अधिक चित्रपट आणि सीडीजचा संग्रह त्यांच्याकडे आहे. धर्मेंद्र यांचा वाढदिवस प्रत्येकवर्षी ८ डिसेंबरला मोफत सरबत वाटून साजरा करतात.