पाऊस झाला कमी, पंचगंगेची पाणीपातळी ओसरु लागली; कोल्हापूर-रत्नागिरी मार्ग सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 12:13 IST2025-08-22T12:11:40+5:302025-08-22T12:13:08+5:30

जिल्ह्यातील ९३ मार्गांवर पाणी : वाहतूक ठप्प

Rains have reduced water level of Panchganga has started receding Kolhapur Ratnagiri route opened | पाऊस झाला कमी, पंचगंगेची पाणीपातळी ओसरु लागली; कोल्हापूर-रत्नागिरी मार्ग सुरु

पाऊस झाला कमी, पंचगंगेची पाणीपातळी ओसरु लागली; कोल्हापूर-रत्नागिरी मार्ग सुरु

कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने उघडझाप दिल्याने पंचगंगा नदीची पाणीपातळी ओसरु लागली आहे. आज, केर्लीनजीक वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला कोल्हापूर - रत्नागिरी महामार्ग शिवाजी पूल येथे वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. मात्र, केर्ले ते केर्ली दरम्यानचा रस्ता पाण्याखाली असल्यामुळे हा मार्ग बंद आहे. यामार्गावरील वाहतूक शिवाजी पूल - केर्ली - जोतिबा रोड - वाघबिळ - रत्नागिरी या मार्गाने सुरु आहे.
 
पावसाने उघडीप दिली असली तरी जिल्ह्यातील राज्य, प्रमुख जिल्हा, इतर जिल्हा व ग्रामीण, असे ९३ मार्ग पाण्याखाली असल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळत असल्या, तरी काही काळ ऊनही पडले होते. पाऊस कमी झाल्याने पुराचे पाणी कमी होईल, अशी अपेक्षा होती; पण धरणातून विसर्ग सुरूच राहिल्याने पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत हळूहळू घट होत आहे. 

राधानगरी धरणाचे तीन स्वयंचलित दरवाजे खुले त्यातून प्रतिसेंकद २९२८ घनफूट विसर्ग सुरू आहे. वारणातून १५३६९ तर दूधगंगेतून १८६०० घनफूट विसर्ग सुरू आहे. पाण्याची पातळी स्थिरावली असली, तरी नदीकाठच्या गावांतील नागरिक, जनावरांचे स्थलांतर सुरू झाले आहे. दरम्यान, दुसऱ्या दिवशी जिल्ह्यातील तीन प्राथमिक, तर एक माध्यमिक शाळा बंद राहिली.

जिल्ह्यात असे झाले स्थलांतर..

तालुका -  कुटुंबे - व्यक्ती - जनावरे

  • राधानगरी  - ४७ - २०२ -  १२८
  • करवीर - ४० - ४६ - ०
  • भुदरगड - ०६ - २२ - ०५
  • कागल - ०२ - ११ - ०


असे आहेत मार्ग बंद

  • राज्य - १०
  • प्रमुख जिल्हा मार्ग - ३९
  • इतर जिल्हा मार्ग - १४
  • ग्रामीण मार्ग - ३०


धरणातील विसर्ग

धरण - विसर्ग (घनफूट) 

  • राधानगरी - ४,३५६
  • वारणा - १५,३६९ 
  • दूधगंगा - १८,६००
  • कासारी - १,५०० 
  • घटप्रभा - ४,२७७ 
  • धामणी - ७,१७५ 


एस. टी. च्या ३४ फेऱ्या बंद

पुराचे पाणी रस्त्यावर आल्याने एस. टी. च्या वाहतुकीला ब्रेक लागला आहे. दिवसभरात एस. टी. च्या ३४ फेऱ्या रद्द झाल्याची माहिती संबंधित विभागाने दिली आहे.

पडझडीत ४८ लाखांचे नुकसान

जिल्ह्यात गुरुवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासात १४२ खासगी मालमत्तांची पडझड झाली. यामध्ये ४८ लाख १५ हजार ५०० रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.

Web Title: Rains have reduced water level of Panchganga has started receding Kolhapur Ratnagiri route opened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.