कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने घेतली उसंत; पंचगंगेची पातळी झाली कमी, बारा बंधारे झाले मोकळे
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 12:12 IST2025-08-26T12:11:35+5:302025-08-26T12:12:27+5:30
धरणातील विसर्गही झाला कमी

छाया-आदित्य वेल्हाळ
कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाची उघडझाप सुरू आहे. अधूनमधून जोरदार सरी कोसळत आहेत. धरणक्षेत्रातही पाऊस कमी असल्याने विसर्ग कमी झाला आहे. पंचगंगेची पातळी २६ फुटांपर्यंत खाली आली असून, दिवसभरात बारा बंधारे पाण्याखालून मोकळे झाले आहेत.
गेल्या पाच दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने उसंत घेतली आहे. सोमवारी सकाळी ऊन पडले, दुपारी ढगाळ वातावरणासह अनेक ठिकाणी जोरदार पाऊस कोसळला. धरणातील विसर्ग कमी झाला असून, राधानगरी धरणातून प्रतिसेंकद १५००, दूधगंगा धरणातून १६००, तर वारणातून ४७३६ घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नद्यांची पातळी झपाट्याने कमी होऊ लागली आहे.
पंचगंगा नदीची पातळी सोमवारी २९.१० फुटांवर होती, सायंकाळपर्यंत ती २६ फुटांपर्यंत खाली आली होती. दिवसभरात बारा बंधारे मोकळे झाले आहेत. इतर जिल्हा मार्ग ९, तर ग्रामीण मार्ग २८, असे ३७ मार्गांवर अद्यापही पाणी असल्याने वाहतुकीस बंद आहेत.
दरम्यान, सोमवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी २.९ मिलिमीटर पाऊस झाला. गगनबावडा तालुक्यात ७.७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, दहा खासगी मालमत्तांची पडझड होऊन तीन लाख १२ हजारांचे नुकसान झाले आहे.