कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची उघडीप, नद्यांच्या पाणी पातळीत घट
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 12:51 IST2025-07-11T12:50:26+5:302025-07-11T12:51:03+5:30
अद्याप ४२ बंधारे पाण्याखाली

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची उघडीप, नद्यांच्या पाणी पातळीत घट
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात गुरुवारी पावसाने विश्रांती घेतली. अधूनमधून पडणाऱ्या हलक्या सरी वगळता दिवसभर कडकडीत ऊन पडले होते. पावसाने विश्रांती घेतली असली तरी पंचगंगेच्या पाणी पातळीत घट झाली आहे. अजूनही ४२ बंधारे पाण्याखाली आहेत. जिल्ह्यात तुरळक पाऊस असला तरी धरणातून विसर्ग सुरू असल्याने नद्यांचे पाणी संथगतीने कमी होत आहे. पंचगंगा नदी सध्या २६.०९ फुटावर पोहोचली आहे.
शहरासह जिल्ह्यात मंगळवारी सकाळपासून पावसाने चांगलीच विश्रांती घेतली. यामुळे शहरात सकाळपासूनच ऊन होते. जिल्ह्यात दोन दिवस तुरळक ठिकाणी पाऊस झाला. गुरुवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी ५.३ मिलिमीटर इतकीच पावसाची नोंद झाली. सर्वाधिक ३२.७ मिलिमीटर पावसाची नोंद गगनबावडा तालुक्यात झाली. पाऊस कमी असला तरी धरणातून विसर्ग कायम आहे. रात्रीत तीन फुटांनी वाढ झालेल्या पंचगंगेची पातळी दिवसभरात मात्र केवळ तीन इंचांनीच वाढली.
राधानगरीतून प्रति सेकंद ३१००, वारणातून ४५०० तर दूधगंगातून १६०० घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नद्यांची पातळी संथगतीने कमी होत आहे. पंचगंगा नदीची पातळी दिवसभरात २६.०९ फुटापर्यंत पोहोचली. दरम्यान, गुरुवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात १७ खासगी मालमत्तांची पडझड होऊन ५ लाख १० हजार रुपयांचे नुकसान झाले.
धरणसाठा, टीएमसीत कंसात पाऊस मिलिमीटर -
- राधानगरी - ६.८४ (९७)
- तुळशी - २.७५ (४४)
- वारणा - २८.२७(२७)
- दूधगंगा - १७.२६ (३६)
- कासारी - २.०० (१९)
- कडवी - २.२० (२३)
- कुंभी - २.०५ (२५)
- पाटगाव - ३.३२ (७०)
पंचगंगा नदी २६.०९ फुटांवर
अजूनही ३८ बंधारे पाण्याखाली आहेत. जिल्ह्यात तुरळक पाऊस असला तरी धरणातून विसर्ग सुरू असल्याने नद्यांचे पाणी संथगतीने कमी होत आहे. गुरुवारी रात्री ८ वाजेच्या माहितीनुसार पंचगंगा नदी सध्या २६.०९ फुटांवर पोहोचली आहे.