Kolhapur: शिरोळमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस; घालवाडमध्ये गारपीट
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 11:58 IST2026-03-18T11:58:15+5:302026-03-18T11:58:47+5:30
रब्बी पिकांसह वीटभट्टी व्यवसायाला मोठा फटका

Kolhapur: शिरोळमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस; घालवाडमध्ये गारपीट
शिरोळ : शिरोळसह जयसिंगपूर, नृसिंहवाडी, दानोळी अब्दुललाट, चिंचवाड यांसह परिसरात मंगळवारी रात्री वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. घालवाड येथे वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. दरम्यान, रब्बी पीक घेतलेल्या शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता असून, झालेल्या पावसामुळे वीटभट्टी व्यवसायांना मोठा फटका बसला आहे.
सकाळपासूनच हवेत प्रचंड उष्मा जाणवत होता. हवामान खात्याच्या अंदाजानंतर रात्री आठच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. घालवाड परिसरात वादळीवाऱ्यासह गारपीट झाली. तालुक्यातील बहुतांशी भागात ढगांच्या गडगडाटासह पावसाने हजेरी लावली. गव्हाचे पीक भिजल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.
पावसामुळे वीटभट्टी व्यावसायिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. दरम्यान, वादळी वाऱ्यामुळे रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा खंडित झाला होता. जयसिंगपूर येथे गुरुवारपासून यात्रा सुरू होत आहे. या ठिकाणी यात्रेची तयारी सुरू आहे. पावसामुळे व्यावसायिकांची तारांबळ उडाली.