पाऊस परतला, मळणीसह प्रचारावरही पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2019 13:08 IST2019-10-17T11:59:21+5:302019-10-17T13:08:08+5:30
पाच-सहा दिवसांच्या विश्रांतीनंतर वादळी पावसाने बुधवारी कोल्हापूरला झोडपून काढले. दुपारपासून गडगडाटासह जोरदार आलेल्या पावसाच्या सरींनी शेतशिवारांसह निवडणुकीच्या प्रचारमंडपांतही धांदल उडवून दिली. मळणीसह प्रचारावरही पूर्णपणे पाणी फिरविले. दरम्यान, रविवार (दि. २०) पर्यंत वादळी पावसाचा तडाखा कायम राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविल्याने तर सर्वच जण चिंतेत आहेत.

पाऊस परतला, मळणीसह प्रचारावरही पाणी
कोल्हापूर : पाच-सहा दिवसांच्या विश्रांतीनंतर वादळी पावसाने बुधवारी कोल्हापूरला झोडपून काढले. दुपारपासून गडगडाटासह जोरदार आलेल्या पावसाच्या सरींनी शेतशिवारांसह निवडणुकीच्या प्रचारमंडपांतही धांदल उडवून दिली. मळणीसह प्रचारावरही पूर्णपणे पाणी फिरविले. दरम्यान, रविवार (दि. २०) पर्यंत वादळी पावसाचा तडाखा कायम राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविल्याने तर सर्वच जण चिंतेत आहेत.
गेल्या पंधरवड्यात परतीच्या पावसाने जिल्ह्यात अक्षरश: धुमाकूळ घातला. पूर्ण दसरा पावसातच गेल्यानंतर गेल्या पाच-सहा दिवसांपासून लख्ख सूर्यप्रकाश पडल्याने सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला होता.
कडक ऊन पडल्याने भुईमूग, सोयाबीनसह भातकापणी व मळणी जोरात सुरू होती. याचवेळी २१ रोजी होणाऱ्या मतदानासाठीचा प्रचार १९ ला सायंकाळी संपणार असल्याने अवघे चारच दिवस हातात राहिल्याने प्रचार टिपेला पोहोचला आहे. प्रचाराचा अंतिम टप्प्यात एकेक तास महत्त्वाचा असल्याने गावागावांत, गल्लोगल्ली एकच धुरळा उडाला आहे.
ही सर्व धांदल सुरू असतानाच दुपारपासून अचानक पाऊस सुरू झाल्याने सभांचे नियोजनच विस्कटून गेले. सकाळपासून तसे वातावरण दिसत होते; पण त्यानंतर ते निवळले होते. दुपारी अचानक पावसाचे आगमन झाले.
तीन-साडेतीनच्या सुमारास जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी तुफानी पाऊस कोसळला. संध्याकाळी पाचनंतर पुन्हा आभाळ भरून आले. ढगांच्या गडगडाटासह आणि विजेच्या लखलखाटासह पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने संध्याकाळी होणाऱ्या सभा व प्रचारफेऱ्यांचे नियोजनच विस्कटले.
पाऊस नसल्यामुळे रेनकोट, छत्र्या घरीच राहिल्याने संध्याकाळी भिजतच घर गाठण्याची वेळ नोकरदारांवर आली. त्यातच आता दिवाळीची खरेदीही सुरू असल्याने बाजारपेठेवरही याचा परिणाम झाला. पाऊस जोरात असल्याने अर्ध्या तासातच रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले. घाण पाण्यातूनच वाट काढत प्रवास करावा लागला. जयंती नाल्यातही पाण्याचा प्रवाह वाढल्याने वाहतूक पोलीस शाखेच्या कार्यालयामागे नाला ओसंडून वाहू लागला.