कोल्हापुरातील गांधीनगरमध्ये बनावट लेबल लावून शर्टची विक्री; गारमेंटवर छापा, व्यापाऱ्यावर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 18:52 IST2025-10-01T18:50:23+5:302025-10-01T18:52:06+5:30
१४ लाखांचा मुद्देमाल जप्त

संग्रहित छाया
गांधीनगर : गांधीनगर मुख्य रस्त्यावरील स्वास्तिक मार्केटमधील अन्सारी गारमेंटवर कॉपीराइटच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकून एका नामवंत कंपनीचे लेबल लावलेले सुमारे १४ लाख ३८ हजार रुपयांचा बनावट शर्ट आणि मुद्देमाल जप्त केला.
याप्रकरणी गारमेंट मालक महंमद मिकाईन अन्सारी (रा . कोयना कॉलनी गांधीनगर) याच्यावर गांधीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतची फिर्याद यू.एस. पोलो कंपनीचे अधिकारी नीरजकुमार नरेंद्रसिंग धहिया (रा. गाझियाबाद, उत्तर प्रदेश) यांनी फिर्याद दिली.
पोलिसातून मिळालेली माहिती अशी - गांधीनगर मुख्य रस्त्यावर स्वास्तिक मार्केट येथील दुसऱ्या मजल्यावर अन्सारी यांचे गारमेंट आहे. त्या गारमेंटमध्ये एका नामांकित कंपनीचे लेबल साध्या गुणवत्तेच्या शर्टावर लावून ती चढ्यादराने विक्री केली जात होती. ही माहिती कंपनीच्या अधिकाऱ्यांना मिळाली.
त्यांनी पोलिसांच्या मदतीने गारमेंटवर छापा टाकून कंपनीचे बनावट लेबल लावलेले ६१० शर्ट आणि इतर लेबल व साहित्य असा सुमारे १४ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईमुळे गांधीनगरातील काही व्यापाऱ्यांनी दुकानाची शटर बंद करून पोबारा केला. ही कारवाई सोमवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. या कारवाईमध्ये कंपनीचे योगेश मोरे, मंगेश देशमुख, नितीन कदम, अविनाश पाटील, अन्य अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला.